मुंबई : मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही जारेदार पडणाऱ्या पावसाने मुंबईकरांसाठी खूशखबर आणली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांपैकी तानसा आणि मोडक सागर तलाव गुरुवारी पहाटे भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे तलावांमध्ये आता ५३.८६ टक्के जलसाठा आहे. विशेष म्हणजे एकाच दिवसात तब्बल ६४ दिवसांचा जलसाठा जमा झाला आहे.
महापालिकेमार्फत दररोज तीन हजार ८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक असते. मात्र जून तसेच जुलै महिन्याच्या पंधरवड्यातही पावसाने दडी मारल्याने तलावांमध्ये जेमतेम १७ टक्के जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे पाणीकपात लागू होण्याची शक्यता होती.
मागील आठवड्यापासून सतत बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे तलाव क्षेत्रात अवघ्या एका आठवड्यात ३६ टक्के जलसाठा वाढला आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदाचा जलसाठा अधिक आहे. त्यामुळे पाणीकपातीचे संकट दूर झाले आहे. सध्या तलावांमध्ये एकूण सात लाख ७९ हजार ५६८ जलसाठा जमा झाला आहे. पुढील २०२ दिवस पुरेल, इतका हा जलसाठा आहे.
चार तलाव भरले
तुळशी हा सर्वांत लहान तलाव १६ जुलै तर विहार तलाव १८ जुलै रोजी भरून वाहू लागला. मात्र बुधवारी रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मोडक सागर तलाव गुरुवारी पहाटे ३.२४ वाजता तर तानसा तलाव पहाटे ५.४८ वाजता भरून वाहू लागला. मोडक-सागर तलावाचे दोन आणि तानसा तलावाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे.
२२ जुलै जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)
तलाव.. कमाल.. किमान.. उपयुक्त साठा (दशलक्ष) सध्या
मोडक सागर १६३.१५ १४३.२६ १२८९२५ १६३.१५
तानसा १२८.६३ ११८.८७ १४४५९३ १२८.६०
विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८ ८०.४७
तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ १३९.३३
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ ९७८० ५९५.८३
भातसा १४२.०७ १०४.९० ३६८१८४ १२७.६०
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० ९२३५२ २६६.१७
वर्ष..... जलसाठा (दशलक्ष लीटर)
२०२१ - ७७९५६८
२०२० - ४१६४२९
२०१९ - ७७८१५९