Join us

खूशखबर: मुंबईत आणखी वर्षभर मालमत्ता करात वाढ नाही, मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 5:52 AM

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मालमत्ता करात वाढ करण्यात आली नव्हती. आता आणखी एक वर्ष मालमत्ता करात वाढ केली जाणार नाही

मुंबई :

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मालमत्ता करात वाढ करण्यात आली नव्हती. आता आणखी एक वर्ष मालमत्ता करात वाढ केली जाणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, की उल्हासनगरमधील १ जानेवारी २००५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांना नियमित करण्यासाठी विशेष कार्यप्रणाली राबविण्यात येईल. त्यासाठी दंडात मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली आहे. हे शुल्क प्रती चौरस मीटर २२०० रुपये आकारले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पोलिसांना पंधरा लाखांत घर

  • बीडीडी चाळीचा पुनर्विकास गतीने पूर्ण केला जाईल. या पुनर्विकास इमारतींमध्ये पोलीसांना केवळ पंधरा लाख रुपयांत घर उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
  • पोलिसांना अधिक घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी गृहनिर्माण धोरणात विशेष तरतूद केली जाईल. पोलिसांना पायाभूत सुविधा 
  • उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. न्यायालयीन विकासासाठी दरवर्षी भरीव निधी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

फेरीवाला धोरणांवरील स्थगिती उठवणार - केसरकर 

  • मुंबईतील  फेरीवाला धोरणांवरील स्थगिती लवकरच उठविण्यात येणार असून लवकरच नवे धोरण जाहीर केले जाईल, अशी घोषणा मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी विधानसभेत केली.  पात्र फेरीवाल्यांचे लवकरच पुनर्वसन करण्यासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
  • भाजपचे अमित साटम यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर केसरकर यांनी सांगितले की, महापालिकेच्या २४ विभागीय कार्यालयांमार्फत जुलै २०१४ मध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यांची एकंदरीत संख्या १ लाख २८ हजार ४४३ इतकी आहे. त्यापैकी एकूण ९९ हजार ४३५ फेरीवाऱ्यांनी अर्ज जमा केले असून एकूण १५ हजार ३६१ फेरीवाले हे फेरीवाल्यांच्या २०१७ च्या योजनांमध्ये पात्र ठरत आहेत.  
  • परिमंडळीय नगर फेरीवाले आणि मुख्य नगर फेरीवाले समितीमार्फत विभाग पातळीवर प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचना यांची पडताळणी करून झाल्यानंतर ४०४ रस्त्यांवर एकूण ३० हजार ८३२ फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यात आले.  
टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबई