मुंबई : ऐन दिवाळीत कांद्याचे भाव कडाडले आहेत. अशावेळी जनतेला सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी नाफेडकडून विक्री केंद्रे सुरू करण्यात आली असून नागरिकांना एक-दोन किलोच्या पॅकिंगमध्ये २५ रुपये किलो दराने कांदा दिला जात आहे. यासाठी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई व पनवेलमध्ये १०० ठिकाणी कांदा विक्री केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. मोबाइल व्हॅनद्वारे हा रास्त दरातील कांदा विक्री करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत २५ विक्री केंद्रांच्या माध्यमातून हा कांदा नागरिकांना उपलब्ध होत आहे. येत्या काळातही सवलतीच्या दरातील कांदा विक्री केंद्र १०० ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत. दिवाळीत नागरिकांना महागाईतून दिलासा नाफेडच्या माध्यमातून सवलतीच्या दरातील विकल्या जाणाऱ्या कांद्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत ग्राहक कल्याण मंत्रालय वेगवेगळ्या ग्राहक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून बाजारपेठेत हस्तक्षेप करत असते. या माध्यमातून नागरिकांना महागाईची झळ बसू नये या उद्देशातून भारत चणाडाळ, भारत आटा व कांदा विक्री केंद्र सुरु करून नागरिकांना दिलासा दिला जातो.