मुंबई - शुक्रवारी मुंबईत केवळ ७८ कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णालयांमध्ये सध्या केवळ १.८ टक्के खाटा भरल्या आहेत. दैनंदिन रुग्णवाढीचा दर ०.०१ टक्के एवढा आहे. गेल्या आठ दिवसांपासून मुंबईत सलग शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. तर कोविडच्या तिसऱ्या लाटेत आतापर्यंत १४ वेळा शून्य मृत्युची नोंद झाली आहे.
मुंबईत आतापर्यंत दहा लाख ५६ हजार ८०७ लोकांना कोरोनाची लागण झाली. यापैकी ९८ टक्के रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. शुक्रवारी बाधित आढळून आलेल्या रुग्णांपैकी ७२ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती. तर लक्षणे असलेले एकूण ६२८ रुग्ण सध्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यापैकी एकूण ३२७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आतापर्यंत दहा लाख ३६ हजार ६३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६०० रुग्ण सक्रिय आहेत.
आतापर्यंत एकूण १६ हजार ६९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी १९ हजार ७३७ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण एक कोटी ६२ लाख ५७ हजार ५७२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर रुग्ण संख्या ५६४५ दिवसांमध्ये दुप्पट होत आहेत. डिसेंबर २०२१ पासून मुंबईत कोविडच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत मुंबईत १४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. जानेवारी महिन्यात एक वेळा, फेब्रुवारीत नऊवेळा तर मार्च महिन्यात चारवेळा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.