मुंबई - आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीला चालना मिळण्यासाठी आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. पुढील काही महिन्यात साधारण आठ हजार पेक्षा जास्त नोकर भरती आरोग्य आणि ग्रामविकास विभागात केली जाणार आहे. कोविड संकटामुळे आरोग्य क्षेत्रात आवश्यक भरती केली जाणार आहे. पुढील दोन महिन्यात नोकरभरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचंही राजेश टोपेंनी सांगितलं. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामस्वामी, संचालक , उपसंचालक आदी उपस्थित होते
राजेशे टोपेंनी राज्यातील कोविड परिस्थितीसंदर्भात चर्चा केल्यानंतर संबंधितांना महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. यावेळी सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची स्वतंत्र बैठक घेऊन राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचे आवाहन केले. आरोग्य यंत्रणेचे संनियंत्रण महत्वाचे असून महत्वाच्या राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. सार्वजनिक आरोग्य सेवेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या.
आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य निगडीत पदं लवकरच भरली जाणार आहेत. राज्य शासनानं भरतीला मान्यता दिली आहे, अशी माहिती राजेश टोपेंनी टीव्ही 9 शी बोलताना दिली. सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे. सेवेचा दर्जा उंचावतानाच सौजन्यपूर्ण वागणूक सामान्यांना द्यावी. आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा. दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असेही टोपेंनी सांगितले.