ज्येष्ठांसाठी खुशखबर : मागाठाणे परिसरातील जेष्ठांसाठी नॅशनल पार्क होणार खुले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 04:36 PM2020-11-04T16:36:59+5:302020-11-04T16:37:36+5:30
National Park will be open : बोरीवलीचे नॅशनल पार्क सुरू होणार आहे.
मुंबई : पर्यटकांचे आकर्षण असलेले आणि मागाठाणे परिसरतील मॉर्निंग वॉक करणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी उद्या दि,5 पासून बोरीवलीचे नॅशनल पार्क सुरू होणार आहे. मागाठाणे विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे बंदच होते. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना रोज सकाळी मॉर्निग वॉक आणि इतर शारीरिक व्यायाम करण्यास फार समस्या येत होत्या. यासंबंधी मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी उद्यापअसून जेष्ठ नागरिकांसाठी सदर राष्ट्रीय उद्यान सुरू करण्यासाठी येथील प्रशासनाशी पाठपुरावा केला होता.
यासंबंधी आमदार प्रकाश सुर्वे यांनी आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अप्पर प्रधान मुख्य वनरक्षक सुनिल लिमये आणि मुख्य वनसंरक्षक मल्लिकार्जुन यांच्या समवेत बैठक घेतली. मागाठाणे परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्याने सदर राष्ट्रीय उद्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्या पासुन खुले करण्याची महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच येत्या काही काळातच सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व जनतेसाठी व पर्यटकांसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खुले करण्याचे आश्वासन उद्यान प्रशासनाने दिल्याची माहिती आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली. यावेळी सुभाष येरुणकर, नंदकुमार सुर्वे आणि ज्येष्ठ नागरीक कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.