चाकरमान्यांसाठी खूशखबर! कोकणात जाण्यासाठी तीन हजार एसटी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 05:53 AM2020-08-05T05:53:58+5:302020-08-05T05:54:09+5:30

गणेशोत्सवासाठी नियमावली घोषित; दहा दिवस व्हावे लागणार क्वारंटाइन

Good news for the servants! Three thousand ST ready to go to Konkan | चाकरमान्यांसाठी खूशखबर! कोकणात जाण्यासाठी तीन हजार एसटी सज्ज

चाकरमान्यांसाठी खूशखबर! कोकणात जाण्यासाठी तीन हजार एसटी सज्ज

Next

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खूशखबर आहे, कारण राज्य सरकारने अखेर नियमावली तयार केली आहे. मुंबई, पुण्यासह अन्य ठिकाणच्या चाकरमान्यांना एसटीने कोकणात जाता येईल. त्यासाठी तीन हजार बसगाड्या तयार असून बुकिंगला सुरुवात झाल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाºया चाकरमान्यांच्या प्रश्नावर गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. राज्य सरकार या प्रश्नावर चालढकल करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी विशेषत: कोकणातील नेत्यांनी केला होता. आज परिवहनमंत्री परब यांनी कोकणाशी संबंधित आमदारांची बैठक घेत गणेशोत्सवाबाबत चर्चा केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार चाकरमान्यांना कोकणात सुखरूप नेण्यात आणि परत आणण्यात येईल. त्यामुळे चाकरमान्यांवरून कोणीही राजकारण करू नये, असा टोला अनिल परब यांनी बैठकीनंतर विरोधकांना लगावला. कोकणात जाणाºया चाकरमान्यांना नियमावलीचे पालन करावे लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना १२ आॅगस्टपर्यंत कोकणात जाता येईल. आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे क्वारंटाइनचा कालावधी दहा दिवस करण्यात आला असून १२ आॅगस्टनंतर कोकणात जाणाऱ्यांनी स्वॅब टेस्ट करणे बंधनकारक असल्याचे परब यांनी स्पष्ट केले. दरवर्षी २२०० गाड्या कोकणात सोडल्या जातात. यंदा तीन हजार बसेस तयार ठेवल्या आहेत. शिवाय, २२ जणांनी ग्रुप बुकिंग केल्यास गावापर्यंत सोडण्याची सोय करण्यात आली आहे. यंदा एसटी ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यात येणार असूनदेखील त्यासाठी कोणतेही अतिरिक्त भाडे आकारण्यात येणार नाही.

एसटीसाठी ई-पासची गरज नाही
एसटीने जाणाºया चाकरमान्यांना कोणत्याही ई-पासची गरज भासणार नाही. मात्र, एसटीशिवाय जे जाणार त्यांना ई-पास घ्यावा लागणार आहे. खासगी बसेसला एसटीपेक्षा दीडपट पैसे घेण्याचा अधिकार आहे, त्याशिवाय कोणी मागणी केली तर लोकांनी पैसे देऊ नये. कोणी अधिकचे पैसे आकारले तर कारवाई करणार असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले. कोकणात जाणाºया चाकरमान्यांनी यंदा नियम पाळून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
 

Web Title: Good news for the servants! Three thousand ST ready to go to Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.