Join us

खुशखबर... एसटीचे ड्रायव्हर अन् कंडक्टर आता 'क्लर्क' होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 7:52 PM

थम नोकरीला प्राधान्य या तत्वानुसार कित्येक पदवीधर आणि पदव्युत्तर युवकांनी चालक व वाहक बनण्याचा निर्णय घेतला.

मुंबई - परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी एसटीतील कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज दिली आहे. महामंडळातील चालक अन् वाहकांना लिपिक पदावर बढती देण्याची घोषणा रावते यांनी केली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी 25 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचे रावते यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महामंडळातील पदवीधर अन् पदव्युत्तर कर्मचाऱ्यांना लिपिक अन् टंकलेखक बनण्याचा मार्ग सुकर झाला आहे. 

एसटी महामंडळातील चतुर्थ श्रेणी पदावरील कर्मचाऱ्यांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यानुसार, चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई, नाईक, हवालदार, उद्वाहन चालक, मजदूर, परिचर, खानसामा, अतिथ्यालय परिचर, सफाईगार, सुरक्षा रक्षक, खलाशी, सहाय्यक माळी, माळी व स्वच्छक या पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन ही घोषणा केली. या निर्णयामुळे महामंडळातील शिक्षित कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार असून त्यांच्यासाठी ही नामी संधी आहे. 

प्रथम नोकरीला प्राधान्य या तत्वानुसार कित्येक पदवीधर आणि पदव्युत्तर युवकांनी चालक व वाहक बनण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पात्रता असूनही त्यांना लिपिक पदासाठी किंवा टंकलेखक पदासाठी अर्ज करण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, परिवहनमंत्री दिवाकर रावतेंच्या या घोषणेमुळे या युवकांना आता नव्याने ही संधी चालून आली आहे. कारण, महामंडळात सध्या चतुर्थ श्रेणी पदावर जवळपास 1 लाख कर्मचारी काम करत आहेत. त्यापैकी, कित्येक तरुण कर्मचारी पदवीधर आणि पदव्युत्तर असून लिपिक व टंकलेखक पदासाठी शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेले आहेत.  

टॅग्स :दिवाकर रावतेएसटी संपबसचालकराज्य रस्ते विकास महामंडळ