ठाणे : ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. सोमवारी देखील शहरात कोरोनाचे ४० रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही ७५२ वर जाऊन पोहचली आहे. तर दिवसभरात तीघांचा मृत्यु झाला आहे. असे जरी असले तरी सोमवारी एका दिवसात शहरात तब्बल १०० कोरोना बाधीत रुग्णांनी या आजारावर मात केल्याने ठाणेकरांसाठी ही दिलासादायक आणि आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या २२४ वर गेली आहे. ठाणे शहरात दिवसागणिक कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील १ मे ते ११ मे या कालावधीत रुग्णांची संख्या ४५० हून अधिक झाली आहे. मार्च ते एप्रिल या कालावधीत ही संख्या ३०० च्या आसपास होती. त्यात आता केवळ ११ दिवसात मोठ्या प्रमाणात भर पडल्याचे दिसून आले आहे. तर आज दिवसभरात तीन कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यु ओढावला असून यामध्ये कोरोना बाधीत आमदाराच्या वाहन चालकाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत २९ कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर रुग्णांची संख्या जशी महापालिका हद्दीत वाढत आहे. तशीच आता कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील आता वाढू लागली आहे. मागील काही दिवस तीन ते चार रुग्ण हे कोरोनामुक्त होत असल्याचे चित्र होते. तर रविवार पर्यंत १२४ जणांनी कोरोनावर मात केल्याचे दिसून आले होते. परंतु आता सोमवारी शहरातील तब्बल १०० कोरोना बाधीत रुग्णांनी या आजारावर मात केली आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी ही निश्चितच आनंदाची आणि दिलासादायक बातमी ठरली आहे.
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, १०० रुग्णांनी केली एकाच दिवशी कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 8:07 PM