मुंबई : गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने दर्जेदार कामगिरी केली आहे. मुंबई विद्यापीठास मुलांच्या सांघिक मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे, तर वैयक्तिक मुलींच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४९ किलो वजन गटात सोमया दळवीने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. पोहण्याच्या २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत आरती पाटीलला द्वितीय क्रमांक, तर ज्योती पाटील या विद्यार्थिनीस तृतीय क्रमांक मिळाला आहे. आरती पाटील आणि ज्योती पाटील या दोघी बहिणी आहेत. १९ ते २९ फेब्रुवारीदरम्यान तिसऱ्या खेलो इंडिया स्पर्धेचे आयोजन गुवाहाटी येथे करण्यात आले आहे.
एकूण १८ क्रीडा प्रकार असलेल्या या स्पर्धेसाठी देशभरातील २०० विद्यापीठांतील ४,५०० खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या वतीने विविध स्पर्धांसाठी निवडक ६० खेळाडू सहभागी झाले आहेत.
१) रग्बी मुले- १२, मल्लखांब मुले-६, मल्लखांब मुली- ६, पोहणे मुले- ४
२) पोहणे मुली- ३, टेबल टेनिस (मुले)- ५
३) टेबल टेनिस (मुली)- ५, फेन्सिंग (तलवारबाजी) मुले- ४
४) टेनिस मुली- ४
५) बॉक्सिंग मुले- २
६) बॉक्सिंग मुली- ३
७)ॲथलेटिक मुले- २
८) आर्चरी मुली- १
९) कुस्ती मुले- १, कुस्ती मुली- ०१, असे एकूण ६० खेळाडू या क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
एकूण १० दिवस चालणाऱ्या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मुंबई विद्यापीठाच्या चमूने वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याचे समाधान असून, यामुळे अनेक खेळाडूंना ऊर्जा आणि प्रेरणा मिळू शकेल, असा आशावाद क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. मोहन अमृळे यांनी व्यक्त केला.