Join us

परस्परांशी चांगले संबंध हेच व्यापारवृद्धीचे सूत्र - वल्लभ भन्साली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:14 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माणसाला जी गोष्ट सहजरीत्या मिळते, त्याची तो कधीच किंमत करीत नाही. हा त्याचा स्वभावगुण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : माणसाला जी गोष्ट सहजरीत्या मिळते, त्याची तो कधीच किंमत करीत नाही. हा त्याचा स्वभावगुण आहे. याउलट एखाद्या दुर्मीळ गोष्टीकडे तो तत्काळ आकर्षित होतो. जैन इंटरनॅशल ट्रेड ऑर्गनायझेशन ही संस्था तिच्या सभासदांना अशीच सहजरीत्या मदत उपलब्ध करून देते. तिचे महत्त्व वेळीच ओळखा. कारण परस्परांशी चांगले संबंध हेच व्यापारवृद्धीचे सूत्र आहे, असे मत अर्थतज्ज्ञ वल्लभ भन्साली यांनी व्यक्त केले.

जैन इंटरनॅशल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या सहयोगाने आयोजित केलेल्या ‘जेबीएन महाकुंभ’ महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. भन्साली म्हणाले, व्यापाराचे जाळे मजबूत राहण्यासाठी संपर्क फार महत्त्वाचा आहे. परदेशी कंपन्यांनी ही बाब हेरून संपर्कालाच आपले बलस्थान बनवले आणि प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेतली. अगदी हडप्पा संस्कृतीपासून व्यापारात हेच सूत्र अमलात आणले जात आहे. त्यामुळे यशस्वी व्हायचे असेल, तर ‘जीतो’ आणि ‘जेबीएन’सारख्या संस्थांचा आधार घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.

५० हजारांहून अधिक लोकांचा सहभाग

व्यापारवृद्धीसह नवउद्यमींच्या पंखांना बळ देण्याच्या उद्देशाने ‘जेबीएन महाकुंभ’ या आभासी व्यापार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ५० हजारांहून अधिक लोकांनी त्यात भाग घेतला. तब्बल १२ सुरू असलेल्या या महोत्सवाची सांगता मंगळवारी परळ येथे झाली. यावेळी जेबीएनचे अध्यक्ष संजय जैन, प्रभारी संचालक महेंद्र सुंदेशा, मुख्य सचिव ऋषभ सावनसुखा यांच्यासह ‘जीतो’ आणि ‘जेबीएन’शी संलग्न असलेले आघाडीचे उद्योजक उपस्थित होते.

जैन इंटरनॅशल ट्रेड ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष गणपत चौधरी आणि मुख्य वक्ते अर्थतज्ज्ञ वल्लभ भन्साली दूरचित्रसंवाद माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाले. या महोत्सवादरम्यान लावलेल्या स्टॉलमधून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ४१ उद्योग संस्था आणि उद्योजकांना यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

..........

फोटो ओळ –

महावीर लुनावत यांना सन्मानित करताना (डावीकडून) ऋषभ सावनसुखा, संजय जैन आणि महेंद्र सुंदेशा.