उद्धव ठाकरे आणि राज्यपालांमधील संबंधांबाबत संजय राऊत यांचे भाष्य, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 03:53 PM2020-05-23T15:53:16+5:302020-05-23T15:54:49+5:30
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वैयक्तिक संबंधांबाबत मोठे भाष्य केले आहे.
मुंबई - महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि राज्य सरकामधील संबंध गेल्या काही काळापासून कमालीचे ताणावपूर्व बनलेले आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीवरून निर्माण झालेल्या पेचामुळे शिवसेना आणि राज्यपालांमधील संबंध बिघडले होते. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वैयक्तिक संबंधांबाबत मोठे भाष्य केले आहे.
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, ‘’राज्यपालांना बरेच दिवस भेटलो नव्हतो. त्यामुळे मी आज त्यांची व्यक्तीश: भेट घेतली आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंध हे अत्यंत मधूर आहेत. दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे. दोघांमधील संबंध हे हे पिता-पुत्रासारखे आहेत. ते तसेच कायम राहतील. त्यात कुठल्याही प्रकारची दरी पडणार नाही.’’
राज्याशी संबंधित विविध प्रश्नांवरून राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये तीव्र मतभेद वारंवार दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत आज शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते.
राज्यपाल कोश्यारी यांनी अंतिम वर्षांच्या परीक्षांवरून उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या भूमिकेबाबत व्यक्त केलेल्या नाराजीबाबत संजय राऊत म्हणाले की, उदय सामंत यांनी शेवटच्या वर्षाच्या परीक्षांबाबत आपले मत मांडले होते. तर राज्यपाल हे कुलपती आहेत. त्यांनीही आपली भूमिका व्यक्त केली. आता दोघांमध्ये चर्चा होईल.