Join us

चेंबूर-घाटकोपर भागातील लसीकरण केंद्रांवर नागरिकांचा चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:07 AM

मुंबई : ४५ वर्षे वयावरील व्याधिग्रस्त नागरिकांच्या लसीकरणानंतर आता केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला मान्यता दिली आहे. ...

मुंबई : ४५ वर्षे वयावरील व्याधिग्रस्त नागरिकांच्या लसीकरणानंतर आता केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला मान्यता दिली आहे. या लसीकरणाला १ एप्रिलपासून सुरुवात झाली. चेंबूर आणि घाटकोपर परिसरातील विविध सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी सकाळपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. काही रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना सोशल डिस्टंसिंग राहील अशी आसन व्यवस्था होती. तर काही रुग्णालयांमध्ये नागरिक एकाच ठिकाणी गर्दी करून रांगा लावून उभे होते.

चेंबूरमधील पालिकेच्या ‘माँ’ रुग्णालयामध्ये गुरुवारी सकाळपासूनच नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी केली होती. तिसऱ्या मजल्यावर हे लसीकरण केंद्र असल्याने नागरिकांनी इमारतीच्या खाली व तिसऱ्या मजल्यावर अशा दोन्ही ठिकाणी रांगा लावल्या होत्या. या वेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क आहे का हे तपासण्यात येत होते. मात्र गर्दी वाढल्यावर या ठिकाणी एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखण्यात येत नव्हते. अशाच प्रकारे गोवंडीचे शताब्दी रुग्णालय, घाटकोपर येथील हिंदू सभा रुग्णालय तसेच या परिसरामधील अनेक खासगी रुग्णालयांमध्येही नागरिकांनी लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला. सकाळच्या तुलनेत दुपारच्या वेळेस उष्णता जास्त असल्याने नागरिकांचा लसीकरण केंद्रांवर कमी प्रतिसाद दिसून आला.