Join us  

दहिसर रिव्हर फेस्टला उस्फूर्त प्रतिसाद; नागरिकांची मोठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2021 3:05 PM

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर दहिसरकरांसाठी "रिव्हर फेस्ट"ची अनोखी भेट

मुंबई-मार्च 2019 पासून सुरू झालेल्या कोरोनाचा प्रभाव आता कमी झाला आहे. शासनाने कोविड निर्बंध शिथील केले असून जवळजवळ सर्वच मुंबईकरांचे लसीचे डोस पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोरोनाचे मळम दूर करत गेल्या दोन दिवसात सुमारे 25000 नागरिकांनी रस्त्यावर उतरून आणि गाण्याच्या ठेक्यावर नृत्य करत दहिसर रिव्हर फेस्टला उस्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे तरुणाई बरोबर जेष्ठ नागरिकांनी दहिसर फेस्टचा मनमुराद आनंद लुटला. शिवसेनेच्या प्रवक्त्या व येथील प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनी या दहिसर रिव्हर फेस्टचे नियोजन बद्ध आयोजन केले आहे.

येथे बग्गी,टेलीफोन बूथ,वारकरी शिल्प,लष्कर तळ,बाईक राईड,झोपडीतील प्रकाशमय दिवे,सत्य मेव जयते,मासेमारी नौका यांची सुंदर प्रतिकृती उभारली असून विशेष म्हणजे तरुणाई सह जेष्ठ नागरिक सुद्धा आपल्या मोबाईल मधून सेल्फी -फोटो काढत ते सोशल मीडियावर व्हायरल करत आहे.

दहिसर नदीच्या तीरावर शिवकन्या आणि श्रीमंत माउली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दि,4 ते 7 नोंव्हेंबर याकाळात अनोख्या  "दहिसर रिव्हर फेस्ट" चे आयोजन केले आहे.लोकमत या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.उद्या रविवार पर्यंत आपल्या सर्वांना या फेस्टची मजा लुटता येणार असून आपण सर्वांनी  दहिसर रिव्हर फेस्टला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन  नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केले आहे. ४ दिवस तरुणांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांना आकर्षित करणारा हा महोत्सव असून ज्यात वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ असलेले स्टॉल्स येथे आहे. 

आज सायंकाळी  तिसऱ्या दिवशी विटामिन आर्ट आणि म्युझिकल नाईट्स चा लक्ष्यवेधी कार्यक्रम तसेच उद्या चौथ्या दिवशी तरुणांनी जरूर पाहावा असा "रूह द बँड" प्रस्तुत बॉलिवूड नाईट्स चा कार्यक्रम असा महोत्सव पार पडणार आहे. 

त्या सोबतच दहिसर नदीच्या नूतनीकरणाचे काम लवकरच सुरु होणार आहे, नूतनीकरण झाल्यानंतर हि नदी कशी दिसेल कोणत्या पद्धतीचे काम करण्यात येईल याचे एक प्रदर्शन देखील या फेस्टिवल मध्ये नागरिकांना येथे पाहायला मिळत आहे. तसेच भव्य रोषणाईने सजलेल्या या परिसरात विशेष सेल्फी पॉईंट्स आणि कलाकृतीमुळे या महोत्सवाला आगळे वेगळे स्वरूप आले आहे.

पहिल्या दिवशी दहिसर नदीच्या तीरावर भव्य दिव्य अशा शिवकन्या प्रतिष्ठान आणि श्रीमंत माऊली प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने दहिसर रिव्हर फेस्ट चा शुभारंभ झाला. येथील दहिसर नदीच्या नूतनिकरणाचा प्रकल्प कसा आहे आणि नदी कशी होती या विषयीच्या प्रदर्शन भरविण्यात आले. ही नदी अबाधित राखण्याची प्रतिज्ञा देखिल नागरिकांनी घेतली.  शिवसेना विभागप्रमुख व आमदार  विलास पोतनीस यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. आपल्या पारंपरिक अभंगांचे नव्या रंगात ढंगात सादरीकरण करणाऱ्या "अभंग रिपोस्ट" यांनी पहिल्या दिवशी सादरीकरण केले. या प्रसंगी सिने कलाकार समीर चौघुले, ब्लॉगर प्रगत लोके तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

काल  दि, ५ नोव्हेंबर रोजी दहिसर रिव्हर फेस्ट चा दुसरा दिवस होता.यावेळी सुमारे 20000 नागरिकांनी सुरेल मराठी गाण्यांवर ठेका धरत संगीतमय संध्येचा आस्वाद घेतला.  या प्रसंगी अरुण नलावडे, अनिल गवस, अनिकेत विश्वासराव, अमोल बावडेकर, अवधूत गुप्ते या कलाकारा आवर्जून या फेस्टमध्ये सहभागी झाले. मराठी गाण्यांची सुंदर मैफिल सजवून नागरिकांची मने या  कलाकारांनी जिंकली. यावेळी शिवसेना राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, मागठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे,युवासेना कार्यकारिणी सदस्य अमोल गजानन कीर्तिकर, सिनेट सदस्या शीतल देवरुखकर आदी विविध राजकीय नेत्यांनी येथे उपस्थिती लावली.