मुंबई : एलएचबी कोचसह मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस विशेषची पहिली फेरी २६ जून रोजी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या मार्गावर प्रथमच व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे. ज्यामुळे प्रवासी निसर्गरम्य सौंदर्याचा आणि अनुभवाचा आनंद लुटत आहेत. गेल्या काही दिवसात व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
२६ जून रोजी सकाळी मुंबईहून पुण्याला जाताना ४४ तर येताना ३४ आसन आरक्षित करण्यात आले होते. २७ जुलै रोजी मुंबईहून पुण्याला जाताना ४१ तर पुण्याहून मुंबईला येताना ४४ आसन आरक्षित करण्यात आले होते. व्हिस्टाडोम कोचमुळे माथेरान टेकडी (नेरळजवळील), सोनगीर टेकडी (पळसधारीजवळ), उल्हास नदी (जांबरुंगजवळ), उल्हास खोरे, खंडाळा, लोणावळा येथील भाग आणि दक्षिण पश्चिम घाटावरील धबधबे, बोगद्यांजवळून जाताना निसर्गरम्य दृश्यांचा आनंद प्रवाशांना घेता येत आहे.