Join us

जीवरक्षक म्हणून कोळी बांधवांना हवा चांगला पगार व नोकरीची हमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 6:57 PM

मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा  आणि गोराई या सहा प्रमुख बीचेसवरील जीवरक्षकांचे पालिकेने खाजगीकरण केले आहे.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा  आणि गोराई या सहा प्रमुख बीचेसवरील जीवरक्षकांचे पालिकेने खाजगीकरण केले आहे. स्थायी समितीने अलिकडेच  12.5 कोटींचे  सहा बीचेसच्या सुरक्षिततेचे आणि जीवरक्षक आणि लागणाऱ्या अन्य सुविधा पुरवण्याचे 3 वर्षांचे कंत्राट हे दृष्टी कंपनीला दिले आहे. सुरवातीला स्थायी समितीने दृष्टी कंपनीला कंत्राट नाकारून मग दुसऱ्या वेळेस मुंबईतील या 6 बीचेसचे कंत्राट दृष्टी लाइफ सेविंग कंपनीला दिले आहे.

दृष्टी लाइफ सेविंग कंपनी सध्या जीवरक्षकांच्या नियुक्तीसाठी मुलाखती घेत असून कोळी बांधवांना जीवरक्षक म्हणून नोकरीत प्राधान्य देण्यात येईल असे कंपनीने आपल्या जाहिरातीत म्हटले आहे.  जीवरक्षक म्हणून दरमहा 11000 पगार दृष्टी लाइफ सेविंगदेणार असल्याचे समजते. पालिकेकडे सध्या या सहा बीचेस वर 11 कायम, कंञाटी 19, हंगामी कोळी 03 असे एकूण 33 जीवरक्षक सेवेत आहेत. 2013 साली पालिकेच्या अग्निशमन खात्यात भरती झालेल्या 19कंत्राटी जीवरक्षकांना सध्या पालिका दरमहा 12000 तर 2013 साली भरती झालेल्या 3 हंगामी जीवरक्षकांना 10000 पगार मिळतो. 2012 साली भरती झालेल्या 11 कायमस्वरूपी जीवरक्षकांना दरमहा सुमारे 30000 पगार व इतर सुविधा मिळतात.

आता दृष्टी लाइफ सेविंग कंपनी 11000 पगार आणि हातात कापून 9520 रुपये कंत्राटी जीवरक्षकांना देणार असल्याचे समजते. दृष्टी कंपनीकडे गोव्याच्या बीचेसच्या सुरक्षिततेची जबाबदती असून गोव्यात त्यांचे 600 जीवरक्षक तैनात आहे. मात्र जर दृष्टी कंपनीला अनुभवी कोळी बांधव जर कंत्राटी जीवरक्षक म्हणून कामासाठी हवे असतील तर किमान दरमहा त्यांना 25000 रुपये पगार व नोकरीची हमी व इतर सुविधा दिल्या पाहिजेत. 2013 साली सुद्धा अग्निशमन खात्याने जीवरक्षक म्हणून कोळी बांधवांची मागणी केली असता त्यांनी याकडे पाठ फिरवली. परिणामी, अग्नीशमन खात्याला फक्त 10000 रुपयांमध्ये काम करणारे 3 हंगामी जीवरक्षक मिळाले होते अशी माहिती महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. त्यामुळे नको रे बाबा दृष्टी कंपनीची कमी पगाराची कंत्राटी जीवरक्षकाची नोकरी असा पवित्रा घेऊन मुंबईतील कोळी बांधव हे दृष्टी कंपनीकडे पाठ फिरवतील असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. 

मुंबईचे बीचेस हे अत्यंत धोकादायक असून या बीचेस वर डोळ्यात तेल घालून 10 तास ड्युटी जीवरक्षकांना करावी लागते. कोळी बांधवांचा रोज समुद्राशी संबंध येत असल्याने ते जीवरक्षक म्हणून आपली जबाबदारी उत्तम प्रकारे निभावू शकतात. मात्र सध्याच्या महागाईत 11000 रुपये पगार हा कोळी बांधवांना परवडणारा नसून कापून हातात 9520 रुपये मिळणार आहे. त्यामुळे किमान किमान दरमहा 25000 रुपये पगार व नोकरीची हमी व इतर सुविधा दृष्टी कंपनीने दिल्या पाहिजेत. तसेच, जर जीवरक्षकांना जीव वाचवताना काही दुखापत झाली तर त्यांना विमा व वैद्यकीय सुविधा देखील जीवरक्षकांना दिल्या पाहिजेत. तरच कोळी बांधव बीचेसवर जीवरक्षक म्हणून काम करण्याचा विचार करतील अशी ठाम भूमिका  किरण कोळी यांनी शेवटी मांडली.

टॅग्स :मुंबई