Join us  

चांगल्या साहित्याचे भाषांतर होणे आवश्यक - जेरी पिंटो

By admin | Published: August 11, 2016 4:14 AM

भारत देश विविधतेने नटलेला आहे. अगदी तीच विविधता साहित्यात आहे. मात्र या चांगल्या साहित्याचे भाषांतर म्हणावे तितके झालेले नाही.

मुंबई : भारत देश विविधतेने नटलेला आहे. अगदी तीच विविधता साहित्यात आहे. मात्र या चांगल्या साहित्याचे भाषांतर म्हणावे तितके झालेले नाही. या साहित्याचे भाषांतर होणे आवश्यक असून या माध्यमातून साहित्याचा प्रसार अधिकाधिक होईल, असे प्रतिपादन लेखक जेरी पिंटो यांनी बुधवारी एसएनडीटी महाविद्यालयातील ग्रंथमहोत्सवात केले.श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठाच्या जुहू कॅम्पसमधील भारतरत्न महर्षी कर्वे ग्रंथालयात ‘ग्रंथमहोत्सव २०१६’चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी या अंतर्गत आयोजित विशेष चर्चासत्रात लेखक जेरी पिंटो बोलत होते. या वेळी विद्यापीठ ग्रंथपाल डॉ. दुर्गा मुरारी, उपग्रंथपाल वृषाली राणे, साहाय्यक ग्रंथपाल जयश्री कांबळे, वरिष्ठ ग्रंथपाल सोनाली बिवेकर, नीलम वराडकर, कनिष्ठ ग्रंथपाल चेतना यादव, उज्ज्वला जुनागडे, सुनीता भोसले, नेहा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.जेरी पिंटो म्हणाले की, देशातील विविधतेप्रमाणे साहित्यातही विविधता आहे. पण हे साहित्य अनेकांपर्यंत अजूनही पोहोचत नाही. या साहित्याला प्रकाशझोतात आणण्यासाठी त्यांचे भाषांतर होणे आवश्यक आहे. मराठीतील ‘बलुतं’सारख्या उत्तम साहित्यकृतीला भाषांतरासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागली याची खंत वाटायला हवी. विद्यार्थ्यांच्या पुस्तक वाचनावरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, पुस्तकांची किंमतही इतर खर्चांपेक्षा कमीच असते. पण तरीही पुस्तक घेण्यासाठी विद्यार्थी टाळाटाळ करतात. पुस्तकांसाठी केलेला खर्च अनेकांना नाहक केल्याचे वाटते. पण महिन्यातून एक पुस्तक घेण्यास काहीच हरकत नाही. त्या पुस्तकाचा अभ्यास करून तुम्हीही चांगल्या पुस्तकांचे भाषांतर करूनसाहित्याचा वसा पुढे नेऊ शकता.दरम्यान, ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला आणि ट्रेजर हंट स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना ‘पोस्टमन’ हा चित्रपट दाखवण्यात आला. (प्रतिनिधी)