गौरी-गणपतींना निरोप
By admin | Published: September 22, 2015 12:30 AM2015-09-22T00:30:08+5:302015-09-22T01:49:24+5:30
दीड दिवसाच्या गणपतींनंतर सोमवारी गौरी-गणपतींना भक्तांनी निरोप दिला. ‘चैन पडे ना आम्हाला’ म्हणत पुढल्या वर्षी लवकर येण्याची विनंतीही भक्तांनी यावेळी केली.
मुंबई : दीड दिवसाच्या गणपतींनंतर सोमवारी गौरी-गणपतींना भक्तांनी निरोप दिला. ‘चैन पडे ना आम्हाला’ म्हणत पुढल्या वर्षी लवकर येण्याची विनंतीही भक्तांनी यावेळी केली.
सकाळपासूनच गौरी-गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात झाली. मात्र सायंकाळी सहा वाजल्यानंतर विसर्जनासाठी चौपाट्यांवर गर्दी होऊ लागली. सायंकाळी आठ वाजेनंतर मात्र चौपाट्याही गणेशभक्तांमुळे तुडुंब भरून वाहू लागल्या होत्या. गणपती नसलेल्या वाहनांना पोलिसांनी चौपाट्यांवर बंदी केली होती. वाहतूक आणि पोलिसांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे दादर, फोर्ट आणि गिरगाव परिसरात यंदा रात्री उशिरापर्यंत वाहतूककोंडी झाली नाही.
आरत्या आणि गाण्यांच्या तालावर बाप्पाला निरोप द्यायला निघालेल्या भक्तांना सायंकाळी सव्वासात वाजताच वरुणराजाने गाठले. परिणामी चारचाकी हातगाड्या आणि डोक्यावर गणपतींच्या मूर्ती घेऊन जाणाऱ्या भक्तांची आणि चिमुरड्यांची धावपळ उडाली. जागा मिळेल तिथे भक्त आडोसा शोधत होते, तर काहींनी प्लास्टिकचे छत आणि छत्र्यांच्या आधारे बाप्पांच्या मिरवणुकीत खंड पडू दिला नाही.
विधिवत
इकोफ्रेंडली विसर्जन !
मालाड (पूर्व) येथील कुरार गावात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बुवा साळवी मैदानात खास कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आहे. या कृत्रिम तलावात पाच दिवसांच्या शेकडो गणपतींचे विसर्जन झाले आहे. गणपती विसर्जनासाठी पाचव्या दिवशी भाविकांची मोठी रीघ तलाव परिसरात दिसून आली.
पालिकेच्या पी (उत्तर) विभागाचे साहाय्यक पालिका आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्या सहकार्याने आणि दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आहे. या उपक्रमाला अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आणि अनेक गणेशभक्तांनी सहकार्य केल्याची माहिती नगरसेवक प्रशांत कदम यांनी दिली.
कृत्रिम तलाव संकल्पनेला सहकार्य करून येथे गणेश विसर्जन करणाऱ्या गणेशभक्तांना आमदार प्रभू, नगरसेवक प्रशांत कदम
आणि दशरथ कदम
यांच्यातर्फे ‘पर्यावरणस्नेही’ प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. अशा प्रकारची विधिवत गणेशविसर्जनाची उत्तम सोय घराजवळ उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांची वाहतूककोंडीच्या त्रासातून मुक्तता होणार आहे.