मुंबई : ‘गणपती गेले गावाला... चैन पडेना आम्हाला’ या जयघोषात राज्यासह मुंबई शहर-उपनगरात ठिकठिकाणी दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. शुक्रवारी मोठ्या आनंदाने व उत्साहात गणरायाचे घरोघरी आगमन झाले होते. मात्र, अनेकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसांतच बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. शनिवारी दुपारी ३ नंतर सहकुटुंब विसर्जनाला सुरुवात झाली. या वेळी कुटुंबीयांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.शनिवारीदेखील पावसाचा शिडकावा सुरूच होता. पावसाची तमा न बाळगता, या पावसाच्या सरी अंगावर झेलतच, भक्तांनी दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी वाजत-गाजत मिरवणुका काढल्या. मुंबईत गिरगाव, दादर, जुहू, अक्सा चौपाटी, पवईसह ठिकठिकाणी तलाव आणि पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये श्रींचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळपासून सुरू झालेले विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरू होते.‘विघ्न दूर कर बाप्पा’ अशी मनोकामना करीत, दुपारनंतर तलावावर गणपती विसर्जनासाठी भाविकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली. सहकुटुंब मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी येणा-यांची संख्याही लक्षणीय होती. बाप्पाचे आगमनच जीवनातील सगळी दु:ख दूर करतो, अशी भावना भक्तांनी व्यक्त केली.३,५१३ गणपतींचे कृत्रिम तलावात विसर्जनशनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत घरगुती २२ हजार ३२६ आणि १३५ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यातील ३, ५१३ गणपतींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाल्याचे पालिकेने सांगितले.
दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप, ३,५१३ गणपतींचे कृत्रिम तलावात विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 1:32 AM