ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप

By admin | Published: September 7, 2016 03:30 AM2016-09-07T03:30:06+5:302016-09-07T03:30:06+5:30

‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ अशा गर्जनेत, ढोल-ताशे, डीजे व बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक

Goodbye to the parents in the drumstick | ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप

ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप

Next

टीम लोकमत,  मुंबई
‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ अशा गर्जनेत, ढोल-ताशे, डीजे व बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे मंगळवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देऊन भावपूर्ण आणि जड अंत:करणाने विसर्जन करण्यात आले.
सोमवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दीड दिवसाचा पाहुणचार घेतल्यानंतर मंगळवारी भक्तांचा निरोप घेतला. या वेळी मुंबई शहर-उपनगरातील सर्व चौपाट्या, तलाव आणि जलाशय परिसरात भक्तीचा महापूर ओसंडूून वाहत होता. मुंबई शहर-उपनगरात अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव आणि समुद्रात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कृत्रिम तलावांमध्ये प्रामुख्याने शहर-उपनगरातील महापौर निवासस्थान, चव्वनी गली मैदान, गजधर पार्क शाळा सांताक्रुझ, गणेशघाट, रामलीला मार्ग मालवणी, दहिसर स्पोटर््स फाउंडेशन, स्वप्ननगरी तलाव, दत्तपाडा, ठाकूर व्हिलेज यांचा समावेश आहे.


महापौरांनी साधला भाविकांशी संवाद
सागरी प्रदूषण कमी व्हावे, या हेतूने महापौर बंगल्यात गेल्या काही वर्षांपासून विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारण्यात येतो. महापौर स्नेहल आंबेकर यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे. त्यांनी स्वत: गणेशमूर्ती विसर्जनासाठी घेऊन येणाऱ्या भाविकांसोबत संवाद साधला.

डीजेच्या दणदणाटाला बगल
डीजेला बगल देत बऱ्याच घरगुती बाप्पांच्या मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्यांचा गजर होताना दिसला. त्यात बऱ्याच कुटुंबांनी ढोल-ताशा पथकांना मिरवणुकांमध्ये सहभागी करून घेतले. त्यामुळे या ढोल-ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या पाहुण्याला निरोप देताना भक्तांचे डोळे पाणावलेले दिसून आले.

दीड दिवसाच्या बाप्पांना डोळ्यांत साठवित अखेरचा निरोप देण्यासाठी शहर-उपनगरातील चौपाट्यांवर भक्तांची गर्दी दिसून आली. गिरगाव, जुहू, वर्सोवा अशा विविध ठिकाणी गणेशभक्तांनी सहकुटुंब हजेरी लावत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
बाप्पासोबत ‘सेल्फी’साठी धडपड
लाडक्या बाप्पाची सेवा केल्यानंतर ‘तो’ गावाला जात असल्याने अखेरच्या सेल्फीसाठी अनेक भक्तांची धडपड सुरू होती. काहींनी बाप्पाच्या आरतीच्या वेळी तर काहींनी अगदी सूर्यास्ताच्या क्षणी किनाऱ्यावर अखेरचा निरोप देताना सेल्फी स्टिक घेऊन तो क्षण आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केला. यात लहानग्यांसह चिमुरड्यांचीही बाप्पासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपड सुरू होती.

सायंकाळी ४ वाजल्यापासूनच अनेक रस्त्यांवर हातगाडी, टॅक्सी, टेम्पो, रिक्षा, कारमध्ये बसून बाप्पा निरोपाला निघालेले होते. पोलिसांनीही ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेतलेली होती. रात्री उशिरापर्यंत अनेक छोट्या-मोठ्या बाप्पांचे ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असा प्रेमळ आग्रह करत विसर्जन करण्यात आले.

अनेक कुटुंबांनी दीड दिवसाचा गणपती बसविला होता. रिद्धी-सिद्धी आणि बुद्धीचा देवता असलेल्या बाप्पाचा मुक्काम घरात चैतन्य निर्माण करणारा ठरतो. त्याचे आगमनच जीवनातील दु:ख दूर करते, अशी भावना विसर्जन करण्यासाठी आलेल्या अनेक गणेशभक्तांनी या वेळी व्यक्त केली. बाप्पाला अखेरचा निरोप देण्यापूर्वी ‘विघ्न दूर कर बाप्पा’ अशी मनोकामना करीत भाविकांनी दुपारनंतर बाप्पाच्या विसर्जनासाठी सुरुवात केली.


सायंकाळी ६ वाजल्यानंतर बहुतांश गणेशभक्तांनी दीड दिवसाच्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात केली.
मोकळ्या रस्त्यांमुळे मोक्याच्या ठिकाणी बराच वेळ वाजत-गाजत भक्तांनी मिरवणूक काढली होती.
प्रत्येक मूर्तीला कॅमेरात टिपण्याचा प्रयत्न करण्यासाठी बहुतेक नवोदित आणि अनुभवी छायाचित्रकारांनी चौपाट्यांवर ठाण मांडले होते.

Web Title: Goodbye to the parents in the drumstick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.