मुंबई : सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्र राज्य अग्निशामक इमारत ते रजाक जंक्शनपर्यंत उन्नत मार्गाच्या एका मार्गिकेचे आणि बीकेसी ते लालबहादूर शास्त्री उड्डाणपुलाला जोडणाऱ्या उन्नत मार्गाच्या एका मार्गिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उद्घाटन केले असून, आता हे मार्ग वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. या प्रकल्पामुळे बीकेसी व कुर्ला भागातील वाहतूककोंडी कमी होणार असून, वाहनचालकांची २५ मिनिटांहून अधिक वेळेची बचत होईल.
बीकेसी व कुर्ला भागातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि सांताक्रूझ चेंबूर रस्त्याद्वारे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडण्यासाठी एमएमआरडीए सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचा विस्तार दोन भागात करीत आहे. त्यानुसार पहिल्या भागात ५.९ किमीचा उन्नत मार्ग आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या भागातील वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेला १.८ किमीचा महाराष्ट्र राज्य अग्निशामक इमारत ते रजाक जंक्शनपर्यंत उन्नत मार्ग आणि १.८ किमीचा महानगर टेलिकॉम निगम (बीकेसी) ते लालबहादूर शास्त्री पुलाला (कुर्ला) जोडणारा १.२६ किमीचा उन्नत मार्ग बांधण्यात आले आहेत. या दोन्ही उन्नत मार्गाची रुंदी ८.५ मीटर असून ही २ लेनची मार्गिका वाहतुकीस खुली करण्यात आली आहे.
ज्याची प्रतीक्षा मुंबईकर खूप दिवसांपासून करत होते; अशा या नवीन एलिवेटेड कॉरिडॉरमुळे मुंबईमधील ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीची गरज पूर्ण होणार आहे. त्याचा फायदा लाखो मुंबईकर घेतील. कॉरिडॉरने लाखो वाहने प्रवास करतील. त्यांच्या वेळेची आणि इंधनाची बचत होईल. कुरार अंडरपास महत्त्वाचा प्रकल्प असून याचा फायदा नागरिकांना होईल.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
भविष्यात एमटीएचएल, मुंबईमधील प्रगतिपथावर असलेल्या मेट्रो मार्गिका तसेच इतर पायाभूत सुविधांचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच पूर्ण करून त्याचे लोकार्पण करू.- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
वांद्रे कुर्ला संकुलातील एमटीएनएल जंक्शनपासून फ्लायओव्हरपर्यंत सुरू होणारा २ मार्गिकांचा उन्नत कॉरिडॉर प्रवाशांना सध्याच्या एससीएलआर मार्गे बीकेसी ते चेंबूर, टिळकनगर या ठिकाणी वाहनांची रहदारी टाळून पूर्वीपेक्षा कमी वेळेत प्रवास करण्यास मदत करेल. जेणेकरून त्यांच्या प्रवासाच्या वेळेत २५ मिनिटांहून अधिक बचत होईल.- एस. व्ही. आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त, एमएमआरडीए