गुडन्यूज... मुंबईतील दोन नव्या मेट्रोंना ‘पॉवर’; महिनाअखेरीस पूर्ण क्षमतेने धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 10:31 AM2022-12-03T10:31:39+5:302022-12-03T10:32:37+5:30
मुंबई शहर आणि उपनगरात बेस्ट, अदानी, टाटा आणि महावितरण या चार वीज कंपन्यांकडून वीजपुरवठा केला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मेट्रो २ अ आणि (दहिसर - डी. एन. नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व - अंधेरी पूर्व) या दोन मेट्रो मार्गिका उभारण्यात आल्या असून, या दोन्ही मेट्रोला वीजपुरवठा करण्यासाठी अदानी कंपनीसोबत भागीदारी करार करण्यात आला आहे. त्यानुसार आता अदानीकडून एमएमआरडीएला वर्षाला २५ मेगावॅट (१२ कोटी युनिट) एवढ्या विजेचा पुरवठा केला जाणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात बेस्ट, अदानी, टाटा आणि महावितरण या चार वीज कंपन्यांकडून वीजपुरवठा केला जातो. बेस्टकडून मुंबई शहरात तर अदानी आणि टाटाकडून मुंबईच्या उपनगरात वीजपुरवठा केला जातो.
भांडूप आणि मुलुंड येथे महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. त्यात आता अदानीने मुंबई महानगर प्रदेशातील म्हणजेच ठाणे आणि नवी मुंबईच्या काही परिसरात वीजपुरवठा करता यावा म्हणून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव दाखल केला आहे.
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मार्गांवरील निम्म्या भागात मेट्रो धावत आहे. उर्वरित मार्गाचे काम पूर्ण झाले असून, मेट्रोची चाचणी घेण्यात आली आहे. या मार्गावर मेट्रो सुरू करण्यासाठी कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी प्रमाणपत्र मिळाले की, डिसेंबरच्या मध्यात उर्वरित मार्गावर मेट्रो वेगाने धावेल.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि मुंबईच्या मेट्रो प्रवाशांना सेवा देताना आनंद होत आहे. वातावरणातील कार्बनचे अस्तित्व कमी करण्यातील सहाय्यासाठी शाश्वत उपाय हे नेहमीच भिन्न राहिले आहेत.
- अदानी इलेक्ट्रिसिटी
मेट्रो २ अ (दहिसर - डी. एन. नगर) व मेट्रो ७ (दहिसर पूर्व - अंधेरी पूर्व) या दोन मेट्रोला अदानी वीजपुरवठा करणार आहे. वर्षाला २५ मेगावॅट विजपुरवठा होणार आहे.