गौरी टेंबकर - कलगुटकर मुंबई : महापालिकेच्या ‘खड्डे दाखवा आणि पाचशे रुपये मिळवा’ या मोहिमेला मुंबईत सुरुवात झाली आहे. या प्रकरणी मालाडच्या चिंचोली बंदर परिसरात चार रस्त्यात असलेल्या एका खड्ड्याची पालिकेच्या अॅपवर शुक्रवारी तक्रार दाखल करण्यात आली. तेव्हा ‘खड्ड्यात माल कमी पडला’ असे कबूल करत, अखेर तासाभरात तो खड्डा पालिकेच्या संबंधित विभागाकडून बुजविण्यात आला.
मालाड पश्चिमच्या चिंचोली बंदर परिसरात नानाभाई भुलेश्वर रोडवर असलेल्या पोलीस चौकीसमोर एक भलामोठा खड्डा पडला होता. पालिकेच्या अॅपवर या खड्ड्याचा फोटो ‘लोकमत’ प्रतिनिधीने अपलोड केला. काही वेळातच १०३९/२०१९-२०२० या क्रमांकांतर्गत खड्ड्याची तक्रार नोंदविण्यात आल्याचा मेसेज प्रतिनिधीच्या रजिस्टर मोबाइल क्रमांकावर आला. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत भिकू जाधव नामक पालिका कर्मचाऱ्याचा पी दक्षिण विभागातून फोन आला. तेव्हा खड्ड्याची नेमकी जागा त्यांनी विचारून घेतली. खड्डा सापडत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. मात्र, पुन्हा काही वेळाने त्यांना फोन केला असता ‘खड्ड्यामध्ये माल कमी पडला, माणूस सामान आणायला गेला आहे’ अशी कबुली त्यांनी दिली. काही वेळाने मूळ खड्डा आणि त्यात नंतर डांबर भरत बुजविण्यात आल्याचा फोटो जाधव यांनी पाठविला. पालिकेने बुजविलेला हा खड्डा हा एक शाळा, दोन रुग्णालये आणि मुख्य म्हणजे आमदार विद्या ठाकूर, तसेच नगरसेवक दीपक ठाकूर यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या रस्त्यावर होता. या खराब रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकल चालकांना त्रास व्हायचा. खड्डा बुजला असला, तरी त्यात भरण्यात आलेले मटेरियल किती दिवस टिकते, याकडे आता स्थानिकांचे लक्ष आहे.