मुंबईत रविवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच सोमवारचा दिवस असल्याने नोकरदार वर्गाची कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लगबग सुरु होती. परंतू, सकाळी सकाळी वाशी खाडी पुलावर ट्रेलरचा अपघात आणि इकडे मध्य रेल्वेवर मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने खोळंबा झाला आहे.
सायन पनवेल महामार्गावर सोमवारी सकाळी साडेसात वाजता दोन ट्रेलरचा अपघात झाला. यामुळे पुणेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर चक्काजाम झाले होते. मानखुर्द पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर मध्य रेल्वेवर कर्जतहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यान मालगाडीचे इंजिन बिघडले आहे. यामुळे गेल्या पाऊण तासापासून अप मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
कल्याणहून इंजिन मागविण्यात आले आहे. मालगाडी बाजुला करून वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. परंतू यास वेळ लागणार आहे. तसेच काही लोकल रद्द कराव्या लागण्याची शक्यता आहे. या बिघाडाचा परिणाम आज दिवसभर राहण्याची शक्यता आहे.