गुगलद्वारे बँकेचा पत्ता शोधणाऱ्या वृद्धाला ९८ हजारांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 06:34 AM2018-12-19T06:34:56+5:302018-12-19T06:35:29+5:30
विमा योजनेच्या कामासाठी त्यांनी सोमवारी विक्रोळीतील बँक गाठली. मात्र, बँक दुसरीकडे शिफ्ट झाल्याचे त्यांना समजले.
मुंबई : गुगलवरून मिळालेल्या बँक अधिकाºयाचा क्रमांक एका ठगाचा निघाला आणि काही सेकंदातच ६० वर्षीय वृद्धाच्या खात्यातून ९८ हजार गायब झाल्याची घटना पवईत उघडकीस आली. या प्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करीत आहेत. दत्ताराम मालपेकर असे वृद्धाचे नाव आहे. विक्रोळीतील खासगी कंपनीतून ते निवृत्त झाले.
विमा योजनेच्या कामासाठी त्यांनी सोमवारी विक्रोळीतील बँक गाठली. मात्र, बँक दुसरीकडे शिफ्ट झाल्याचे त्यांना समजले. त्यांनी गुगलद्वारे बँकेचा पत्ता शोधण्यास सुरुवात केली. त्यांना घाटकोपरमधील बँकेचा पत्ता, मोबाइल क्रमांक मिळाला. त्या क्रमांकावर संपर्क साधला असता समोरच्या व्यक्तीने तो बँक अधिकारी असल्याचे सांगून त्यांना माहिती दिली. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना आॅनलाइन व्यवहार करण्याचा सल्ला दिला. बोलण्यात गुंतवून त्यांच्या डेबिट कार्डची माहिती मिळवली. याच खात्यावर त्यांचे निवृत्तिवेतन जमा होते. फोन ठेवल्यानंतर त्यांना आलेल्या संदेशामुळे त्यांना धक्का बसला. कारण, त्यांच्या खात्यातून ९८ हजार रुपये गेल्याचा तो संदेश होता. या प्रकरणी त्यांनी पवई पोलिसांत तक्रार दिली. ठगाने गुगलवर स्वत:चा क्रमांक कसा दिला, यासह ठगाचाही पोलीस शोध घेत आहेत.