गुगल पेवर १ रुपया घेतला; ७५ हजारांना गंडा; आर्मीचा मेजर बनत बँकरचीच फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 01:03 PM2023-10-01T13:03:28+5:302023-10-01T13:03:42+5:30
सांताक्रुझ परिसरात असलेल्या बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याला आर्मीचा जवान बनत गंडा घालण्यात आला.
मुंबई : सांताक्रुझ परिसरात असलेल्या बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याला आर्मीचा जवान बनत गंडा घालण्यात आला. याप्रकरणी त्यांनी वाकोला पोलिसांत धाव घेतल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.
तक्रारदार वसुंधरा परब (४२) या ग्रँट रोडला राहत असून, सांताक्रुझ पूर्व परिसरात असलेल्या यस बँकेत डिपार्टमेंट सीनियर मॅनेजर पदावर काम करतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी साडेदहा वाजता त्यांच्या मोबाइलवर आदित्यकुमार नावाने एकाने कॉल केला. तो आर्मीमध्ये मेजर असून, त्याला परब यांचा पुण्यातील फ्लॅट खरेदी करायचा आहे, असे तो म्हणाला. परब यांनी साइटवर त्यांच्या घराच्या विक्रीबाबत जाहिरात दिली होती.
या व्यक्तीने परब यांना शेखावत नावाच्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक देऊन तो एक लाख रुपयांचे टोकन पाठवेल, असे सांगितले.
शेखावतला फोन केल्यावर त्यांनी परत गुगल पे ॲपमधून एक रुपया आणि नंतर २५ हजार पाठवायला सांगितले. मात्र, पुन्हा जेव्हा परब यांनी त्याला २५ हजार पाठवले ते क्रेडिट झाले नाही. त्याबाबत शेखावतला विचारणा केल्यावर गुगल पेवर परत २५ हजार रुपये त्याखाली रिफंड अशी नोट लिहून पाठवायला त्याने सांगितले. अशाप्रकारे एकूण ७५ हजारांचा चुना परब यांना लावला.