मुंबई : गर्भवती वहिनीच्या सोनोग्राफीसाठी जोगेश्वरीतील एका रहिवाशाला ५५ हजार रुपये गमवावे लागले आहेत. गुगलवरील ठगांमुळे त्यांची फसवणूक झाली असून, याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांनी वहिनीच्या सोनोग्राफीसाठी जवळच्या हॉस्पिटलचा मोबाईल क्रमांकासाठी गुगलवरून सर्च सुरू केला. २६ जुलै रोजी त्यांनी संपर्क साधला असता, कॉलधारकाने ऑनलाइन नोंदणी करण्यास सांगून मोबाईलवर लिंक पाठवली. यात ५ रुपये भरून माहिती भरण्यास सांगितले. तक्रारदार यांनी विश्वास ठेवून संबंधित लिंकमध्ये माहिती भरली. त्यानंतर मोबाईलवर आलेला संदेश त्याला पाठवला. यातच त्यांच्या खात्यातून ५ रुपये डेबिट झाले. २७ तारखेला सकाळपासून पैसे वजा होत असल्याचे संदेश धड़कले. यात एकूण ५६ हजार रुपये वजा झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.
ऑनलाईन ठगांनी हा पर्याय वापरून बँकांसह शासकीय, खासगी आस्थापनांचा अधिकृत संपर्क क्रमांक खोडून स्वत:चा मोबाईल क्रमांक गुगलवर देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे समोरून बोलणारी व्यक्ती बँक, ग्राहक सेवा केंद्रातील अधिकारी असे भासवून वापरकर्त्यांशी संवाद साधला जातो. पुढे मोबाईलवर लिंक धाडून त्याद्वारे आपली गोपनीय माहिती मिळवून ही मंडळी आपल्या खात्यातील रकमेवर डल्ला मारत आहे. त्यामुळे अशा ठगांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.
गुगलच्याच सर्व्हेनुसार, प्रति सेकंद जगभरातून ४० हज़ारांहून अधिक जण गुगलच्या सर्च इंजिनवर विविध प्रश्न, माहितीसाठी शोध घेतात. गुगलच्या सर्च इंजिनवर काहीही शोधणे सहज शक्य आहे. जवळची बँक शाखा, मोबाईल किंवा विज बिल भरणा केंद्र, विविध सेवा पुरवठादार कंपन्यांचे सर्व्हिस सेंटर, ग्राहक तक्रार केंद्र, हॉटेल या आणि अशा प्रत्येक शासकीय, खासगी आस्थापनांचा पत्ता, संपर्क क्रमांक, अचूक दिशा दर्शविणाऱ्या नकाशासाठी गुगलचा उपयोग होतो. हे तपशील अचूक असावे यासाठी गुगलने सजेस्ट अॅन एडिट हा पर्याय दिला. त्याद्वारे तपशील बदलता येतो.