ऑनलाइन ठगांची ‘गुगल’ला गुगली, तपशील बदलण्याच्या पर्यायाचा गैरवापर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 06:05 AM2019-03-04T06:05:20+5:302019-03-04T06:05:32+5:30

‘गुगल’ या सर्च इंजिनवर काहीही शोधणे सहज शक्य आहे.

Google's online go-between Google has misplaced the option to change details | ऑनलाइन ठगांची ‘गुगल’ला गुगली, तपशील बदलण्याच्या पर्यायाचा गैरवापर

ऑनलाइन ठगांची ‘गुगल’ला गुगली, तपशील बदलण्याच्या पर्यायाचा गैरवापर

Next

मनीषा म्हात्रे 

मुंबई : ‘गुगल’ या सर्च इंजिनवर काहीही शोधणे सहज शक्य आहे. त्यामुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर या सर्च इंजिनचा आधार घेतला जातो. वापरकर्त्यांना अचूक माहिती मिळावी, म्हणून गुगलनेही खासगी, शासकीय आस्थापनांचे उपलब्ध तपशील बदलण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मात्र, याचाच फायदा घेत आॅनलाइन ठग बँकांसह शासकीय, खासगी आस्थापनांचा अधिकृत संपर्क क्रमांक बदलून तेथे स्वत:चा मोबाइल क्रमांक नोंदवित आहेत. माहितीसाठी फोन आल्यानंतर आपणच बँक अधिकारी, सेवा केंद्रातील अधिकारी आहोत, असे भासवून ते वापरकर्त्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत.
गुगलच्याच सर्व्हेनुसार, प्रती सेकंद जगभरातून ४० हजारांहून अधिक जण गुगलच्या सर्च इंजिनवर विविध प्रश्न, माहितीसाठी शोध घेतात. जवळची बँक शाखा, मोबाइल किंवा वीजबिल भरणा केंद्र, विविध सेवा पुरवठादार कंपन्यांचे सर्व्हिस सेंटर, ग्राहक तक्रार केंद्र, हॉटेल या आणि अशा प्रत्येक शासकीय, खासगी आस्थापनांचा पत्ता, संपर्क क्रमांक, दिशादर्शक नकाशा असे सर्व काही येथे एका क्लिकवर मिळते. हे तपशील अचूक असावेत, यासाठी गुगलने ‘सजेस्ट अ‍ॅन एडिट’चा पर्याय दिला आहे. त्याद्वारे तपशील बदलता येतो.
आॅनलाइन ठगांनी हाच पर्याय वापरून बँकांसह शासकीय, खासगी आस्थापनांचा अधिकृत संपर्क क्रमांक बदलून तेथे स्वत:चा मोबाइल क्रमांक गुगलवर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे समोरून बोलणारी व्यक्ती बँक, ग्राहकसेवा केंद्रातील अधिकारी आहे, असे वाटून वापरकर्ते त्यांना सर्व वैयक्तिक माहिती देतात.
बँकेतून बोलत आहोत, असे सांगून वापरकर्त्यांकडून बँक खाते, डेबिट-क्रेडिट कार्डच्या तपशीलची मागणी केली जाते. ती माहिती मिळताच त्याआधारे आॅनलाइन ठग संबंधितांच्या खात्यातून परस्पर पैसे काढत आहेत. सध्या दिवसाआड अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहेत. वृद्धांसह उच्चशिक्षितही याचे शिकार ठरत आहेत.
>दोन महिन्यांतील घटना
बँकेचा पत्ता गुगलद्वारे शोधणे गोदरेज कंपनीतून निवृत्त झालेले दत्ताराम मालपेकर (६०) यांना महागात पडले. गुगलवर मिळालेला संपर्क क्रमांक बँकेऐवजी ठगाचा असल्याने त्यांनी ९८ हजार रुपये गमविले.
ई-वॉलेटचे ग्राहक सेवा केंद्र समजून साधलेल्या संवादानंतर दिल्लीतील महिलेच्या खात्यातून दीड लाख रुपये काढण्यात आले.
फॅशन डिझायनर तरुणीने २१ डिसेंबर रोजी गुगल पेवरून काही पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे ट्रान्सफर करण्यात अडचण आली. त्यानंतर, चार तासांनी बँकेतून बोलत असल्याचे सांगून ठगाने संवाद साधला. एटीएम ब्लॉक होईल, असे सांगत त्यांच्या एटीएमची माहिती घेतली. त्यानंतर, त्यांच्या खात्यातून तब्बल ४ लाख ३ हजार ३२१ रुपये गेले. दादर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
>गुगलकडून प्रतिसाद नाही
अशा प्रकारची फसवणूक लक्षात येताच, सायबर महाराष्ट्रने गुगलला पत्र पाठवून खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. मात्र, अद्याप त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक बलसिंग राजपूत यांनी सांगितले.
‘अधिकृत संकेतस्थळे शोधा’
बँक खात्यासह डेबिट-क्रेडिट कार्डचे तपशील कोणालाही देऊ नयेत. आॅनलाइन व्यवहारांसाठी ओटीपीची (वन टाइम पासवर्ड) विचारणा होते. ओटीपीशिवाय व्यवहार पूर्ण होत नाहीत. त्यामुळे मोबाइलवर ओटीपी क्रमांक दर्शविणारा लघुसंदेश आल्यास, त्यातील तपशील कोणालाही देऊ नयेत. गुगलद्वारे माहिती मिळविताना संबंधित आस्थापनाच्या अधिकृत संकेतस्थळाचा शोध घ्यावा. त्यावरून संपर्क क्रमांक किंवा अन्य तपशील घ्यावेत, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Google's online go-between Google has misplaced the option to change details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल