आरे आणि नॅशनल पार्कच्या तलावातील विसर्जन बंदी उठवा, गोपाळ शेट्टी यांची मागणी
By मनोहर कुंभेजकर | Published: October 18, 2023 05:34 PM2023-10-18T17:34:44+5:302023-10-18T17:35:24+5:30
Mumbai: 2016 पासून दूध विकास अधिकारी तथाकथित पर्यावरणवाद्यांच्या मागणीवरून कपोलकल्पित बातम्या पसरवून हिंदू सणांमध्ये व्यत्यय आणला जात असल्याचा असा आरोप भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला .
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आरे कॉलनीच्या तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन होत होते. पण 2016 पासून दूध विकास अधिकारी तथाकथित पर्यावरणवाद्यांच्या मागणीवरून कपोलकल्पित बातम्या पसरवून हिंदू सणांमध्ये व्यत्यय आणला जात असल्याचा असा आरोप भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला . केंद्र सरकारने 2020 मध्ये सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, मोठ्या आणि पीओपीच्या मूर्ती वगळता मातीच्या मूर्तींचे विसर्जन नद्या आणि तलावांमध्ये केले जाऊ शकते. पण दुग्ध विकास विभागाचे अधिकारी तुकाराम मुंढे आणि आरेचे सीईओ बाळासाहेब वाघचौरे हे विनाकारण विसर्जन करण्यास व्यत्यय आणत आहेत.
एका अधिकाऱ्याने २०१६ मध्ये राष्ट्रीय उद्यानाच्या नदीत मगर आल्याचे सांगितले होते. त्यानंतर यंदा पासून सुरक्षेच्या भीतीने गणेशमूर्ती नदीत विसर्जित करणे, देवीच्या मूर्तींचे विसर्जन, छठपूजा, अगदी कावड यात्रेसाठी नदीतून पाणी नेण्यासही बंदी घालण्यात आली आहे. कोणत्या अधिकाऱ्याने मगर पाहिली? त्याबद्दल तपशील नाही. मगरीच्या दर्शनाच्या आधारे न्यायालयाकडून विसर्जन बंदीचा आदेश काढण्यात आला आहे. तो सर्वस्वी चुकीचा असल्याचे ते म्हणाले.
खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, कावड यात्रेसाठी लोक नदीतून पाणी गोळा करायचे. आता महापालिका तिथे टँकर पार्क करून त्यात नदीचेच पाणी भरून ते पुरवते. हा हिंदू धर्माच्या अनुयायांचा अपमान असून तो कदापी खंपवून घेतला जाणार नाही. प्रशासकीय अधिकारी केंद्र सरकारचे नियम पाळत नाहीत. आरेतील तलावाभोवती स्थानिक खासदार गजानन किर्तीकर यांनी लाखो रुपयांचा निधी गुंतवून तलाव विकसित केला आहे. पण आता तिथे गणपती विसर्जन तसेच बोटिंग खेळण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. आता नवरात्रोत्सवात ही देवीच्या मूर्ती विसर्जन बंदी कायम असणार आहे.
गणपती विसर्जना वेळी तेथे कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती.सदर बंदी उठवण्या संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले. यंदा जरी विसर्जन शक्य नसले तरी किमान पुढील वर्षीपासून आरे आणि नॅशनल पार्कच्या तलावात विसर्जनाला परवानगी द्यावी असे त्यांना दिलेल्या पत्रात नमूद केल्याचे त्यांनी सांगितले.