मनोहर कुंभेजकर, मुंबई: आज सायंकाळी सव्वा सात वाजता नरेंद्र मोदी हे देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे. या सोहळ्याला अनेकांना निमंत्रणे दिल्ली वरून पाठवण्यात आली आहेत. मात्र उत्तर मुंबईचे दोन वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व करणारे गोपाळ शेट्टी यांनाच दिल्लीने निमंत्रण दिले नसल्याने उत्तर मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
मुंबईत भाजपाची वाताहत झाली असतांना, उत्तर मुंबईतून भाजपचे एकमेव खासदार पियुष गोयल निवडून आले.त्यांच्या विजयात शेट्टी यांचा सिंहाचा वाटा होता. येथील सहा विधानसभा मतदार संघ गोयल यांच्या बरोबर पायाला भिंगरी लागल्या प्रमाणे त्यांनी पिंजून काढले.त्यामुळे या नवख्या मतदार संघात गोयल यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील यांचा ३५७६०८ मतांनी पराभव केला, मात्र शेट्टी यांचा २०१९ चा ४६५२४७ मतांचा विक्रम त्यांना मोडता आला नाही.
शेट्टी यांना उत्तर मुंबईत मानणारा मोठा वर्ग आहे.त्यांनी दि,१८ मे रोजी कांदिवलीत आयोजित अयोध्या श्री राम भांडाऱ्यात त्यांच्या हजारो चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.त्यामुळे आगामी विधानसभा आणि त्यानंतर होणाऱ्या पालिका निवडणुकीत उत्तर मुंबईत शेट्टी यांना असे डावलून चालणार नाही असे सूचक विधान भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
याबाबत खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मला मुंबई व प्रदेश भाजपा कडूनआजच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण होते, मात्र दिल्लीकडून निमंत्रण आले नाही. कार्यकर्त्यांनी 'लोकमत'कडे त्यांची भावना व्यक्त केली असेल, मी अजिबात नाराज नाही,मात्र मी स्वाभिमानी जीवन जगलो असून मी स्वाभिमानी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.