शक्तिप्रदर्शन करत गोपाळ शेट्टी यांनी सादर केला अपक्ष उमेदवारी अर्ज
By मनोहर कुंभेजकर | Published: October 29, 2024 02:56 PM2024-10-29T14:56:10+5:302024-10-29T14:56:25+5:30
गोपाळ शेट्टी इच्छुक असताना त्यांच्याऐवजी मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली.
मनोहर कुंभेजकर, मुंबई- भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी पक्षातून बंडखोरी करत आज दुपारी बोरिवली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दहिसर पश्चिम येथील रुस्तुमजी शाळेत सादर केला आहे. काल भाजपने आपल्या यादीत गोपाळ शेट्टी इच्छुक असताना त्यांच्या ऐवजी मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेट्टी समर्थकांनी काल सायंकाळी सुमारे दोन तास पोईसर जिमखान्या बाहेर धरणे आंदोलन केले. तर आज भाजप कार्यकर्ते शेट्टी यांच्या समर्थनार्थ निवडणूक अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने सकाळी कांदिवली पश्चिम येथील पोयसर जिमखान्यावरून त्यांच्या रॅलीत सहभागी झाले. पोयसार जिमखाना ते दहिसर पश्चिम रुस्तुमजी स्कूलपर्यंत जागोजागी शेट्टी यांचे विविध संस्था व नागरिकांनी स्वागत केले.
यावेळी गोपाळ शेट्टी म्हणाले की, बोरिवलीच्या सन्मानासाठी मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. आता पक्षाने तिकीट दिले तरी मी घेणार नाही. बोरिवली ही काही धर्मशाळा नाही. बोरिवलीत नेहमी बाहेरचा उमेदवार दिला जातो. हा माझा व माझ्या बोरिवलीकर मतदारांचा अपमान आहे. कोणालाही विश्वासात न घेता बोरीवलीतून उमेदवारी दिली जाते हे पक्षासाठी घातक आहे.