पाणी कनेक्शन तोडायाला आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना गोपाळ शेट्टी यांनी घातला घेराव!
By मनोहर कुंभेजकर | Published: November 26, 2024 07:09 PM2024-11-26T19:09:28+5:302024-11-26T19:10:13+5:30
माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि येथील रहिवाश्यांनी घेराव घालत व जाब विचारत सुमारे दोन तास बंदिस्त केले.
मनोहर कुंभेजकर, मुंबई-बिल्डरच्या दबावामुळे बोरिवली पश्चिम कल्पना चावला चौक,आर्य भट्ट रस्यावर असलेल्या येथील हिरदास नगर येथील विष्णू निवास या बैठ्या चाळीतील रहिवाश्यांचे पाणी कनेक्शन कापायला गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना चक्क माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि येथील रहिवाश्यांनी घेराव घालत व जाब विचारत सुमारे दोन तास बंदिस्त केले.
काल दुपारी दोन वाजता आर मध्य विभागाचे जल विभागाचे कर्मचारी येथील रहिवाश्यांचे पाणी कनेक्शन तोडायला गेले. सदर घटना समजताच शेट्टी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आंदोलन केले.
याबाबत गोपाळ शेट्टी यांनी सांगितले की,बिल्डरच्या दबावाखाली आर मध्य विभागाचे महापालिका कर्मचारी त्यांचे पाणी कनेक्शन तोडायला आले.बिल्डरने त्यांच्या कडून १२००० चौफूट दराने मागणी केली होती, आणि ते देणे त्यांना शक्य नव्हते.
जेव्हा मी एका जबाबदार पदावर होतो तेव्हाही जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच सज्ज होतो आताही कोणत्याही पदावर नसतानाही मी जनतेच्या सेवेसाठी त्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आजही तेवढाच कटिबद्ध आहे.या पुढेही जनसेवा करण्याची माझी जबाबदारी अशीच सुरू राहणार आहे. जो पर्यंत विष्णू निवास चाळीची समस्या दूर होत नाही व त्या गरीब नागरीकांना न्याय मिळत नाही तो पर्यंत मुंबई महानगर पालिका प्रशासन व अश्या विकासकांच्या विरोधात माझी लढाई नेटाने सुरुच राहील.या नडलेल्या अडलेल्या गरीब नागरिकांना न्याय देणारच असा विश्वास गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला.
पालिका आणि बिल्डर विनाकारण गरिबांना त्रास देतात.मला जरी जनतेसाठी कायदा हातात घेतला तरी मी तो घेणार,मात्र जनतेवर अन्याय होवू देणार नाही.पोलिसांनी मला ताब्यात घेतले,आणि माझे निवेदन घेतले अशी माहिती त्यांनी दिली.