मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून अरविंद सावंत, भाजपाकडून कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 09:53 AM2019-05-30T09:53:12+5:302019-05-30T09:56:45+5:30
नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आज सायंकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत काही मोजकेच नेते मंत्रिपदाची शपथ घेतील.
मनोहर कुंभेजकर
मुंबई - शिवसेनेतर्फे दक्षिण मुंबईतून खासदार अरविंद सावंत यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी याबाबतची घोषणा केली आहे. याचबरोबर भाजपातर्फे उत्तर मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आज सायंकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत काही मोजकेच नेते मंत्रिपदाची शपथ घेतील. यावेळी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या एका मंत्र्याला शपथ दिली जाणार आहे. मंत्रिपदाची घोषणा शपथविधीच्या पाच तास आधी केली जाणार आहे. विशेष म्हणजे मित्रपक्ष सांगतील तो खासदार नाही तर मोदी ठरवतील त्याला मंत्रीपद मिळणार असल्याचे समजते.
मुंबईमधून पीयूष गोयल यांना अर्थमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. अरूण जेटली यांनी प्रकृती ठीक नसल्याने मंत्रीमंडळात सामावून घेऊ नये, अशा आशयाचे पत्र मोदींना लिहिले होते. तसेच नितीन गडकरी हे देखिल शपथ घेतील. मात्र, याचबरोबर काही मित्रपक्षांचे मंत्रीही शपथ घेणार आहेत. यामध्ये शिवसेनेचे एक मंत्री असणार आहेत.
Sanjay Raut, Shiv Sena: From Shiv Sena one leader will take oath as a minister. Uddhav ji has given Arvind Sawant's name, he will take oath as a minister. pic.twitter.com/P1SYqTubqD
— ANI (@ANI) May 30, 2019
भाजपातर्फे उत्तर मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंबई महानगर पालिकेचे चार वेळा नगरसेवक, दोन वेळा आमदार, 2014 आणि परत आता 2019 मध्ये खासदार म्हणून ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. उत्तर मुंबईतून 2014 साली त्यांनी काँग्रेसचे संजय निरुपम यांचा 4,46, 000 मतांनी दारुण पराभव केला होता. तर2019 मध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यावर 4,64,328 मतांनी मात केली होती.