Join us

मुंबईचा अंत पाहू नका, खा. गोपाळ शेट्टी यांचे पालिका आयुक्तांना खरमरीत पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 12:29 PM

मुंबईच्या रस्त्यांवरील हजारो खड्यांमुळे मुंबईकरांमध्ये संताप

मनोहर कुंभेजकर 

मुंबई - मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची चाळण झाली असून हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. महापालिकाने खड्डे बुजवले असले तरी काही खड्डेच बाकी आहेत असा जो दावा करण्यात येतो तो अत्यंत हास्यास्पद आहे. आज ही मुंबईच्या रस्त्यांवर हजारो खड्डे पडले असून यामुळे मुंबईकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पालिका प्रशासनाने खड्यांसाठी कंत्राटदारांना जबाबदार ठरवून खड्यांची जबाबदारी झटकत आहे असा आरोप उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकमतशी बोलतांना केला. त्यांनी याबाबत खरमरीत पत्रच पालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिले आहे. मुंबईतील खड्डे बुजवण्याचे काम कंत्राटदारांमार्फत न करता पालिका प्रशासनाने आपल्या रस्ते खात्यामार्फत केले पाहिजे असं स्पष्ट मत असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या चार वर्षातील कार्य अहवालाचे देशभर कौतुक होत आहे. या जनसंपर्क अभियानाअंतर्गत आपल्या उत्तर मुंबईतील नागरिकांना भेटण्यासाठी जात असताना नागरिक मुंबईतील रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा सवाल करतात. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि एका राज्याचे बजेट असलेल्या मुंबई महानगर पालिकेला ही अभिमानास्पद बाब नसल्याची टिका त्यांनी केली. मुंबईचा अंत पाहू नका असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. मुंबईकर जेवढे मुंबईवर प्रेम दाखवतात तेवढाच क्रोध देखील दाखवतात याची आयुक्त म्हणून आपण नोंद घ्यावी असे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या पत्रातून आयुक्तांना ठणकावून सांगितले आहे. आपण मुंबईतील खड्यांच्या समस्येबाबत गांभिर्याने विचार करून आपल्या संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन मुंबई खड्डेमुक्त करा. अन्यथा नागरिकांमार्फत आंदोलन केल्यास त्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी पालिका प्रशासनच जबाबदार असेल याची नोंद घ्यावी असा ठोस इशारा त्यांनी दिला आहे.

मुंबई महानगर पालिकेत कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता, उप अभियंता, मुख्य अभियंता, सहाय्यक पालिका आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष ,गटनेते, सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष, उप महापौर, महापौर अशी मोठी फौज आहे. मात्र मुंबईतील रस्त्यांवरील खड्यांची जबाबदारी झटकून फक्त येथील सर्व खड्यांना कंत्राटदारच कसे जबाबदार आहेत असे भासवण्याचा प्रयत्न करीत आहे ही खेदाची बाब आहे असे खासदार शेट्टी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. पालिका प्रशासनाने फक्त कंत्राटदारावर कामे सोपवून चालणार नाही, तर या कामावर देखरेख ठेवणे आणि वेळीच योग्य पावले उचलणे गरजेचे असल्याची भूमिका त्यांनी शेवटी आपल्या पत्रात मांडली आहे. 

टॅग्स :मुंबई