मुंबईः मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर आणि काँग्रेस आमदार काशीराम पावरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी उपस्थितांना संबोधित केलं.ते म्हणाले, मी भाजपमध्ये पहिल्यापासून कार्यकर्ता म्हणून काम केले आहे, राज्याला कोणी वाली राहतो की नाही अशी स्थिती उभी राहली होती. पण मुख्यमंत्र्यांच्या रुपात वाली मिळाला. मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या मागे उभे राहावे. मी कोणतेही तिकीट मागितलेले नाही, फक्त धनगर समाजाची जबाबदारी घ्या, असं म्हटलं होतं. भाजपचे सरकार आम्हाला काही तरी देऊ शकते, विरोधक राज्यामधलं सर्व वातावरण गढूळ करायचे काम करत आहेत. प्रकाश आंबेडकरांशी माझा कोणताही वैयक्तिक वाद नाही, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले. माणसं जरा नोटीस आली की रडतात; मला फक्त मंगळसूत्र चोरल्याच्या आरोपात जेलमध्ये टाकलं ते चालतं का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ आहे. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांनी बारामतीमधून निवडणूक लढवावी, असं फडणवीस म्हणाले. पडळकर यांनी बारामतीमधून निवडणूक लढवल्यास यंदा आपण बारामतीही जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पडळकर यांना बारामतीमधून उमेदवारी मिळावी यासाठी पक्ष नेतृत्त्वाशी बोलणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.शिरपूरचे आमदार काशीराम पावरा भाजपमध्ये दाखल झाल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पावरा काँग्रेसचे वरिष्ठ नेते अमरिश पटेल यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यामुळे पटेलदेखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसे संकेतदेखील दिले आहे. अमरिश पटेल 2 दिवसात भाजपमध्ये येणार असल्याचं पाटील म्हणाले. आमदार आले की त्यांच्या नेत्यांना यावंचं लागतं, असं विधान या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यामुळे अमरिश पटेल लवकरच कमळ हाती धरण्याची शक्यता आहे.