Maharashtra Bandh: काकांचे दु:ख सतावत असल्यानेच ‘महाराष्ट्र बंद’चा देखावा; गोपीचंद पडळकरांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 01:12 PM2021-10-11T13:12:57+5:302021-10-11T13:14:03+5:30
Maharashtra Bandh: योगी आदित्यनाथ क्षमतापूर्ण आहेत, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते नक्कीच कठोर निर्णयही घेतील, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
मुंबई: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीच्या (Lakhimpur Kheri Incident) निषेधार्थ महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने 'महाराष्ट्र बंद' (Maharashtra Bandh) ची हाक दिली आहे. राज्यभरात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेकडून दडपशाही केली जात असून, मुंबईत बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. भाजप, मनसेने या बंदला विरोध केला आहे. यातच भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी खोचक टीका केली असून, काकांचे दु:ख सतावत असल्यानेच महाराष्ट्र बंदचा देखावा करण्यात आला आहे, असे पडळकर यांनी म्हटले आहे.
लखीमपूरच्या शेतकऱ्यांबद्दल आम्हाला संपूर्ण सहानूभूती आणि सहवेदना आहे. म्हणूनच याचा सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. आमचे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ क्षमतापूर्ण आहेत, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते नक्कीच कठोर निर्णयही घेतील, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
मुळात तुम्हाला काकांचे दु:ख सतावतय
गोपीचंद पडळकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून टीका केली आहे. मुळात तुम्हाला काकांचे दु:ख सतावत आहे. कारण पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या सहकाराला लागलेली प्रस्थापितांची कीड साफ करायला घेतली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे खाणारे, कारखाने कवडीमोल भावाने गिळणाऱ्यांवरती फास आवळत आहेत. त्याचेच पित्त झाल्यामुळे हा महाराष्ट्र बंदचा देखावा करण्यात आला आहे, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.
जनाब राऊत तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला
जनाब राऊत तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला. तो ओल्या दुष्काळामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला आहे. शेतकऱ्याचा साताबारा कोरा करू म्हणणारे अजूनपर्यंत त्याला मदत द्यायला बांधावरती पोहचले नाहीत. अजूनही शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या खाबूगिरीतच अडकवलेले आहे. तुमचा हा महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे आपल्या घरात आग लागलेली असताना शेजारच्या गावातील धुरावर बोंबा मारण्यासारखे आहे, असे चिमटेही पडळकर यांनी काढले आहेत.
दरम्यान, भाजप नेते राम कदम यांनीही ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान करतो. शेतकऱ्यांमुळे पोटाला भाकरी मिळते. पण शेतकऱ्यांच्या आडून महाराष्ट्रातील या तिन्ही पक्षांनी तसेच देशातील विरोधी पक्षाने राजकारण करण्याचे दु:साहस करु नये. जर लोकांना जबरदस्तीने बंद करण्यास भाग पाडले गेले, तर आम्ही रस्त्यावर उतरू! पालघर हत्या प्रकरण, काश्मीरमध्ये हिंदूंची हत्या, मुंबई महाराष्ट्रात अनेक निर्भया प्रकरणनंतर ही कधी महाराष्ट्र सरकारला बंदची आठवण कशी आली नाही, अशी विचारणा राम कदम यांनी केली आहे.