महाज्योती संस्थेच्या संचालक मंडळावर गोपिचंद पडळकर यांचे गंभीर आरोप, फडणवीसांना पत्र लिहून केली अशी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 01:00 PM2022-11-16T13:00:59+5:302022-11-16T13:02:41+5:30
Gopichand Padalkar: भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महाज्योती संस्थेच्या संचालक मंडळावर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई - भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महाज्योती संस्थेच्या संचालक मंडळावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच संस्थेतील व्यवस्थापकीय संचालक बदलून तिथे पुर्णवेळ व बहुजन विद्यार्थ्यांचे प्रश्न संवदेनशीलतेने हाताळण्याऱ्या अधिकाऱ्यास संधी द्यावी, अशी मागणी पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या या पत्रात गोपिचंद पडळकर म्हणतात, आपण मुख्यमंत्री असताना बहुजन, गोर गरीब विद्यार्थ्यांचा प्रशासनातील टक्का वाढावा, त्यांचा कौशल्य विकास व्हावा , बहुजन समाजातील विविध समस्यांचा धोरणात्मक अभ्यास व्हावा, या हेतून आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्यानावाने महाज्योती या संस्थेची स्थापना केली. परंतु स्थापने नंतर काही महिन्यातच दगाबाजीने सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने महाज्योती सारख्या अत्यंत महत्वाच्या संस्थांना स्वत:च्या फायद्याच्या यंत्रणा म्हणून पाहिलं. त्यामुळे संस्थेची प्रशासकीय यंत्रणा पुर्णत: ढासळली होती. यावर वारंवार बहुजन विद्यार्थ्यांनी आवाज उठवला. आपलं सरकार सत्तेत आल्यानंतर तातडीने आपल्या मार्गदर्शनाखाली खात्याचे मंत्री मा. अतुलजी सावे यांनी महाज्योती संस्थेचे अनेक रखडलेले निर्णय एका दिवासात मार्गी लावले आहेत.
परंतु आघाडी कार्यकाळात स्थापित झालेल्या अनेक चुकीच्या प्रशासकीय प्रथा आजही कार्यरत आहेत. सातत्याने महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक, खात्याचे सचिव यांच्या विरोधात त्या पद्धतीच्या प्रतिष्ठित माध्यमांमध्ये बातम्याही येत आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचे प्रशिक्षण कोणत्या संस्थेकडून घ्यायचे याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. परंतु कोणतेही स्पर्धात्मक खुले कंत्राट न मागवता. आघाडी सरकाच्या काळातील कंत्राटेच महाज्योतीच्या संचालकांकडून व प्रशासकीय यंत्रणेकडून पुढे रेटले जात आहे. यामुळे वारंवार माध्यमांमध्ये शिंदे-फडणवीस सरकाच्या प्रतिमेला तडा जात आहे. आपण महाज्योती संस्थेची स्थापना एका उद्दात्त हेतूने केली आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी संस्थेतील व्यवस्थापकीय संचालक बदलून तिथे पुर्णवेळ व बहुजन विद्यार्थ्यांचे प्रश्न संवदेनशीलतेने हाताळण्याऱ्या अधिकाऱ्यास संधी द्यावी. त्यामुळे आपल्या पारदर्शकतेच्या प्रतिमेला आणखी झळाळी मिळेल व बहुजन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल ठरेल, अशी मागणी पडळकर यांनी या पत्रामधून केली.