Join us

गोराईची लकीस्टार मच्छीमार बोट समुद्रात बुडाली; ११ जणांना वाचवले तर २ जण अद्याप बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 9:27 PM

गोराईच्या जुलेप चुनेकर या नाखवाची लकी स्टार ही मच्छीमार बोट मासेमारी साठी 1 ऑगस्ट रोजी समुद्रात गेली होती.

मीरारोड - मासेमारी साठी गेलेली मुंबईच्या गोराई मधील लकीस्टार बोट सुमारे 16 किमी खोल समुद्रात वादळीवारा आणि खवळलेल्या लाटांनी आज मंगळवारी सकाळी बुडाली . बोटीतील दोन जण बेपत्ता झाले तर 11 जण सुमारे 5 तास जिवाच्या आकांताने समुद्रात मदतीच्या प्रतिक्षेत होते . उत्तनच्या गोडकिंग मच्छीमार बोटीवरील मच्छीमारांनी 11 जणांना वाचवले. 

गोराईच्या जुलेप चुनेकर या नाखवाची लकी स्टार ही मच्छीमार बोट मासेमारी साठी 1 ऑगस्ट रोजी समुद्रात गेली होती. बोटीवर 13 जण होते. पाऊस त्यातच वादळीवाऱ्याने समुद्र खवळला असल्याने उंच लाटा उसळत होत्या. किनाऱ्या पासून सुमारे 16 किमी लांब खोल समुद्रात असलेली लकीस्टार बोट खवळलेल्या उंच लाटेने मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास उलटली. बोटीवरील 13 जण समुद्रात फेकले गेले. बोटीच्या वरील लाकडी मांडव आणि फायबरचे मोठे बॉल हाती लागावेत म्हणून प्रत्येकाची जिवाच्या आकांताने धडपड सुरु झाली . यात दोघे जण समुद्रात कुठे बेपत्ता झाले ते कळलेच नाही . यात काही ज्यांना मार देखील लागला . 11 जण फायबरचे बॉल व लाकडी मांडव धरून जीव वाचवण्यासाठी धडपडत होते . खवळलेल्या समुद्रात त्यांना कोणी मदतीसाठी जवळपास कोणी दिसत नव्हते. 

उत्तनच्या भूतोडी बंदरातील गॉडकिंग ही मच्छिमार बोट वादळा मुळे पुन्हा किनाऱ्यावर निघाली होती . त्यावेळी बोटीवरील ग्रीडन डुंगा , माल्कम फर्नांडिस आदी बोटीवरील मच्छीमारांना जिवाच्या आकांताने समुद्रात सदर 11 म्हच्छीमार व खलाशी दिसून आले. लगेच या मच्छीमारांनी बोट त्यांच्या जवळ नेली आणि दोरखंड टाकून सर्व अकरा जणांना बोटीवर घेत त्यांचे जीव वाचवले. वाचलेल्या या सर्वाना सायंकाळी चौक धक्क्यावर आणण्यात आले . तेथे गोराई व उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस तसेच मच्छीमार जमले होते . 11 जणांना वाचवण्यात आले असले तरी सतीश विठ्ठल जगताप ( 27) व मंगेश राघू तोडगे ( 25 ) या दोघा खलाशांचा मात्र अजूनही शोध लागलेला नाही. तटरक्षक दल आणि नौदल कडून दोघांचा शोध घेतला जात असल्याचे मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी सांगितले . 

गॉडकिंग बोटीवरील माल्कम फर्नांडिस यांनी सांगितले कि , आम्ही वादळीवारे आणि समुद्र खवळलेला असल्याने परत उत्तन किनाऱ्याला निघालो होतो . त्यावेळी वाटेत हे 11 जण समुद्रात फायबर बॉल आणि बोटीच्या वरचा लाकडी मांडव धरून तरंगत असताना दिसून आले . त्यासर्वाना आम्ही त्वरित दोरीच्या सहाय्याने आमच्या बोटीवर घेतले . सुमारे 5 तासा पासून ते सर्व पाण्यात होते. खोल खवळलेल्या समुद्रात लाटांचे तडाखे खात तब्बल 5 तास हे 11 जण मृत्यूशी संघर्ष करत होते . उत्तनची गॉडकिंग बोट आणि त्यावरील मच्छीमार देवासारखे मदतीला धावून आले . त्यांच्या मुळे आज 11 मच्छीमार व खलाश्यांचे जीव वाचले अशी भावना साश्रुनयनांनी गोराईच्या मच्छीमारांनी बोलून दाखवली. 

टॅग्स :मुंबईमच्छीमार