मुंबईसह मीरा-भाईंदर, ठाणे, नवी मुंबई, खारघरपर्यंत बससेवा चालवणाऱ्या बेस्ट प्रशासनाकडून मात्र गोराई आणि मनोरी ही गावे मुंबई महापालिकेच्या हद्दीत असतानादेखील ही गावे बेस्ट उपक्रमाच्या हद्दीत नसल्याचे सांगत बससेवा चालविण्यास नकार दिला आहे. यामुळे या दोन गावांतील हजारो मुंबईकरांना तसेच पर्यटनासाठी येणाऱ्यांना बेस्टची सुविधा दिली जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
भाईंदरच्या हद्दीतील उत्तन, चौक, डोंगरी, पाली, तरोडी ही गावे तर मुंबईच्या हद्दीतील गोराई व मनोरी गावे धारावी बेटावरची आहेत. मूळची कोळी, शेतकरी आणि नंतर ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याने ईस्ट इंडियन म्हणून ओळख असलेल्या भूमिपुत्रांची. समुद्रापासून आत येणारी गोराईची खाडी असल्याने मनोरी, गोराई, कुळवेम आदी गावांत रस्ता मार्गाने ये-जा करण्यासाठी भाईंदरचा एकमेव पर्याय आहे.
गोराई आणि मनोरी जेट्टीवरून बोटीने खाडीतून ये-जा करावी लागते, परंतु जेट्टीकडे जायचे व परतायचे तरी रिक्षाचा खर्चिक प्रवास करावाच लागतो. त्यामुळे शिक्षण, नोकरी वा अन्य कामानिमित्त रस्ते मार्गाने जायचे असेल तर भाईंदरवरूनच जावे लागते किंवा बोटीशिवाय अन्य पर्याय नाही.
बस गाड्या चालविणे अडचणीचेया भागातील प्रवाशांचे हाल होत असल्याने उत्तन येथील जागरूक नागरिक रोशन डिसोझा यांनी बेस्ट प्रशासनाकडे गोराई, मनोरीसाठी बससेवा सुरू करण्याचे पत्र दिले होते, परंतु बेस्टचे गोराई उपआगार व्यवस्थापक जगदीश सपकाळे यांनी डिसोझा यांना लेखी उत्तर देत हा परिसर खाडीच्या पलीकडे असल्याने तसेच बेस्ट उपक्रमाच्या हद्दीत नसल्याने बसगाड्या चालविणे अडचणीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.