अखेर गोराईकरांनी स्वत:च १० लाख खर्चून बांधली स्मशानभूमी, प्रशासनाला चपराक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:45 IST2025-02-27T15:43:35+5:302025-02-27T15:45:06+5:30
बोरीवली पश्चिमेतील गोराई खाडीपलीकडील गोराई गावात पूर्वी समुद्रकिनारी उघड्या शवदाहिनीवर ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करायला लागत होते.

अखेर गोराईकरांनी स्वत:च १० लाख खर्चून बांधली स्मशानभूमी, प्रशासनाला चपराक!
मनोहर कुंभेजकर, मुंबई
बोरीवली पश्चिमेतील गोराई खाडीपलीकडील गोराई गावात पूर्वी समुद्रकिनारी उघड्या शवदाहिनीवर ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करायला लागत होते. परंतु, भरतीच्या वेळी पाण्यामुळे अनेकदा मृतदेह अर्धवट वाहूत जात असत. तसेच हवेमुळे अर्धवट जळत असल्याने त्यांची विटंबना होत असे. त्यामुळे स्मशानभूमी बांधावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी महापालिका, सरकार तसेच लोकप्रतिनिधींकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला. त्या वेळेपुरती यंत्रणा येऊन पाहणी करुन जात असे. त्यानंतर परिस्थिती जैसे थे राहत होती. याला कंटाळून ग्रामस्थांनी एकत्र येत जामदाड पाडा येथे स्वखर्चाने १० लाख रुपये खर्चून स्मशानभूमी बांधली. हिंदू, ख्रिस्ती आणि आदिवासींनी एकत्र येऊन ही स्मशानभूमी बांधली आहे.
मी स्वत: १० फेब्रुवारीला जामदाड पाडा येथील स्मशानभूमीचा जागेची पाहणी केली. तेथील ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करुन येथे सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार त्याची पूर्तता करणार आहे.
- संजय उपाध्याय, आमदार
समुद्रकिनारी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आणि बालकांचे दफन करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे येथील ख्रिश्चन, हिंदू आणि आदिवासी बांधवांनी स्मशानभूमी बांधली आहे. १० फेब्रुवारीला आमदार संजय उपाध्याय यांनी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.
- स्विस्ती हेन्रिक्स, अध्यक्ष, गोराई ग्रामस्थ कल्याणकारी संघटना