Join us

अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना म्हाडा पाठवणार गोराईला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 4:21 AM

वादामुळे रखडला पुनर्विकास; धोका लक्षात घेता ८१५ पैकी १९७ भाडेकरू स्वत:हून पडले घराबाहेर

मुंबई : मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचे दरवर्षी म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचित विभागामार्फत पावसाळापूर्व सर्वेक्षण करण्यात येते. यंदाही म्हाडाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये सुमारे २३ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत. या इमारतींतील काही रहिवाशांनी स्वत:हून स्थलांतर केले आहे, तर अद्याप ज्या ३२९ रहिवाशांनी स्थलांतर केलेले नाही त्यांना टप्प्याटप्प्प्याने गोराई येथील म्हाडाच्या संक्रमण शिबिरांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

उपकरप्राप्त इमारतीचे जागामालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये वाद असल्याने त्या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. यातील अनेक इमारतींची दुरुस्ती आणि पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाने ना हरकत प्रमाणपत्र दिले असतानाही विकास होत नसल्याने रहिवाशांना धोकादायक इमारतींमध्ये राहावे लागत आहे. या इमारती कधीही कोसळून दुर्घटना घडू शकते, मात्र हे रहिवासी आपले घर सोडण्यास तयार नाहीत. संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतर केल्यास आपल्याला वर्षानुवर्षे तेथेच राहावे लागेल या भीतीने हे रहिवासी राहते घर सोडण्यास तयार नाहीत. जीव मुठीत घेऊन ते येथेच राहत आहेत. मात्र, आता बºयाच रहिवाशांना संक्रमण शिबिरामध्ये राहावे लागत असल्याने या धोकादायक इमारतींमधील रहिवासी घर सोडण्यास घाबरत आहेत.

अतिधोकादायक असलेल्या या २३ इमारतींमध्ये सुमारे ५०७ निवासी तर ३०८ अनिवासी असे एकूण ८१५ गाळे आहेत. त्यापैकी १९७ भाडेकरूंनी इमारतीला असलेला धोका लक्षात घेता तेथून बाहेर पडत स्वत:हून इतरत्र आपली सोय केली आहे. तर सहा जणांना म्हाडाने इतर संक्रमण शिबिरांमध्ये पाठविले आहे. उर्वरित ३२९ भाडेकरूंना म्हाडा गोराई येथील म्हाडाच्या संक्रमण शिबिरामध्ये पाठविणार आहे. या ठिकाणी म्हाडाचे ४०० गाळे आहेत.

टॅग्स :म्हाडा