‘ती’ गोरेगाव-चर्चगेट लोकल सुरूच राहणार, पश्चिम रेल्वेची माहिती; प्रवाशांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 11:43 AM2024-04-25T11:43:55+5:302024-04-25T11:45:28+5:30
गोरेगाव येथून चर्चगेटकरिता सकाळी ९:५३ वाजता सुटणारी जलद लोकल सुरूच राहणार असल्याचे पश्चिम रेल्वेने बुधवारी स्पष्ट केले.
मुंबई : गोरेगाव येथून चर्चगेटकरिता सकाळी ९:५३ वाजता सुटणारी जलद लोकल सुरूच राहणार असल्याचे पश्चिम रेल्वेने बुधवारी स्पष्ट केले. त्यामुळे या लोकलने चर्चगेट गाठणाऱ्या रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पश्चिम रेल्वेने ही लोकल रद्द करण्याचा घाट घातला असून, त्याऐवजी एसी लोकल चालविण्यात येणार असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. विशेषत: या लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांनी स्वाक्षरी अभियान राबवित लोकल रद्द करण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. अखेर पश्चिम रेल्वेने लोकल रद्द केली जाणार नसल्याची माहिती बुधवारी दिली.
मान्सूनसह इतर कामांकरिता घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे लोकल रद्द करण्यात आली होती. लोकल कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेली नाही, रद्द करणार नाही. गोरेगाव येथून आहे त्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालविली जाईल. - सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
सकाळी पीक अवरला चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ओव्हरफ्लो असतात. प्रवाशांच्या सोयीसाठी गोरेगाव, बोरीवली येथून लोकल सोडल्या जातात. गर्दी वाढल्याने चर्चगेटच्या दिशेने लोकल फेऱ्यांची संख्या वाढवावी, यावर प्रवाशांकडून सातत्याने भर दिला जात आहे.