- मनोहर कुंभेजकर
मुंबई : चर्चगेट ते विरार हे अंतर रेल्वेने पूर्ण करण्यास सुमारे दीड तास लागतो. मात्र सध्या पावसामुळे झालेली रस्त्यांची चाळण, कुलाबा ते थेट दहिसर पर्यंत सुरू असलेली मेट्रो ची कामे, मुंबईतील वाहनांची सुमारे 20 लाखाच्या आसपास असलेली संख्या यामुळे मुंबईचे शेवटचे टोक असलेल्या दहिसर पासून मंत्रालय किंवा सीएसटी येथे जाण्यासाठी किमान तीन तास व येण्यासाठी तीन तास लागतात. हीच परिस्थिती पश्चिम उपनगरातील गोरेगाव-अंधेरीची आहे. त्यामुळे नको तो वाहनाचा प्रवास अशी भावना लोकप्रतिनिधीं व मुंबईकरांमध्ये वाढीस लागली आहे. लवकर वेळेवर पोहचण्यासाठी किती का गर्दी असेना लोकप्रतिनिधीमध्ये चक्क रेल्वेने प्रवास बरा ही भावना वाढीस लागत आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे वेळ पाळण्यात शिस्तशीर आहेत.मंत्री नसतांना देखील विधानसभेत अधिवेशनाला किंवा मंत्रालयात त्यांनी वेळेवर पोहचण्यासाठी रेल्वेने प्रवास केला आहे. तर अलिकडेच राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी चक्क मंत्रालयातून आपल्या कांदिवली येथील निवासस्थानी येण्यासाठी चर्च गेट ते कांदिवली असा प्रवास केला होता. तर मागाठाणेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे अधिवेशनात किंवा मंत्रालयात वेळेत पोहचण्यासाठी बोरिवली ते चर्चगेट असा प्रवास करतात.
आज मुंबई महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेला वॉर्ड क्रमांक 58 नगरसेवक व पी दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष संदीप पटेल, वॉर्ड क्रमांक 50 चे भाजपा नगरसेवक दीपक ठाकूर, वॉर्ड क्रमांक 51चे शिवसेना नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर, वॉर्ड क्रमांक 56 च्या भाजपा नगरसेविका राजुल देसाई, वॉर्ड क्रमांक 57 च्या नगरसेविका श्रीकला पिल्ले यांनी जातांना व येतांना एकत्रित प्रवास केला.आज पालिका सभागृह रात्री 8 च्या सुमारास संपल्यामुळे आम्ही चर्चगेट ते गोरेगाव असा येतांना प्रवास केला अशी माहिती संदीप पटेल यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना संदीप पटेल यांनी सांगितले की, मी नगरसेवक झाल्याच्या पहिल्या दिवसापासून रेल्वेने प्रवास करतो. वेळेत पोहचण्यासाठी मला रेल्वेने प्रवास करणे आवडते. गोरेगावचे इतर सहकारी नगरसेवक पूर्वी आपल्या वाहनांनी पालिका मुख्यालयात यायचे. गोरेगाव वरून जायला अडीच तास व यायला तीन तास लागत असत. त्यांना मी समजावून सांगितले की,तुम्ही माझ्या सारखा रेल्वेने प्रवास करा, बघा तुमचा किती वेळ वाचतो.आणि माझी सूचना मान्य करून त्यांनी रेल्वेने प्रवास केला. या प्रवासा दरम्यान आमच्या अनेक विषयांवर गप्पा रंगल्या आणि कधी सीएसटी आले ते कळालेच नाही.सोबत गोरेगावकर असलेले जेष्ठ पत्रकार युवराज मोहिते होते.त्यामुळे आमचा रेल्वे प्रवास खूप आनंदी झाला असे पटेल यांनी शेवटी अभिमानाने सांगितले.