Join us  

मुंबईत पुन्हा 'हिट अँड रन'; १७ वर्षीय मुलाने चुकीच्या दिशेने गाडी चालवत घेतला दुधविक्रेत्याचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 12:11 PM

अल्पवयीन मुलाने गाडी चालवत केलेल्या भयंकर अपघातानं पुन्हा एकदा मुंबई शहर हादरलं आहे.

Mumbai Accident : पुण्याच्या कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यभरातून हिट अँड रनची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. मुंबईतल्या वरळीतही शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाने कावेरी नाखवा या महिलेला फरफट नेलं होतं. या दुर्घटनेत कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा मुंबईतून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. गोरेगावात एका विचित्र अपघातात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आलीय.

मुंबईत पुन्हा हिट अँड रनचे प्रकरण समोर आलं आहे. गोरेगाव परिसरात अल्पवयीन चालकाच्या वाहनानं दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोरेगावच्या आरे कॉलनीत हा सगळा प्रकार घडला. गुरूवारी पहाटेच्या सुमारास १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या एसयूव्ही गाडीने २४ वर्षीय दुचाकीस्वारास धडक दिली. या धडकेत २४ वर्षीय नवीन वैष्णव या तरुणाचा मृत्यू झालाय. नवीन वैष्णव हा पहाटे दूध पोहोचवण्याचे काम करायचा. मात्र अल्पवयीन मुलाने दिलेल्या धडकेत नवीनला नाहक जीव गमवावा लागला.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नवीन वैष्णवच्या दुचाकीला पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास चुकीच्या दिशेने येणाऱ्या महिंद्रा स्कॉर्पिओने धडक दिली. त्यानंतर स्कॉर्पिओ चालक गाडीसह घटनास्थळावरून पळून गेला. नवीनला धडक दिल्यानंतर स्कॉर्पिओ गाडी विजेच्या खांबाला धडकली. त्यामुळे गाडीतील चौघेही जखमी झाले. अशा स्थितीतही अल्पवयीन चालकाने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी  अल्पवयीन मुलासह इतर तिघांना अटक केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून वैष्णवला रुग्णालयात नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी  १७ वर्षीय अल्पवयीन चालक, स्कॉर्पियो गाडीचा मालक इकबाल जीवानी (४८) आणि मोहम्मद फज इकबाल जीवानी (२१) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी कार जप्त करून अल्पवयीन आरोपीसह आरोपींना अटक केली. तसेच घटनेच्या वेळी अल्पवयीन मुलगा मद्याच्या प्रभावाखाली होता की नाही हे तपासण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अपघातापूर्वी आरोपीने त्याच्या मित्रांसोबत पार्टी केली होती का याचा तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीअपघातमुंबई पोलीस