गोरेगाव आगप्रकरणी ‘अळीमिळी गुपचिळी’; समिती नियुक्त, अग्निशमन दलाचे मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 02:41 PM2023-10-11T14:41:47+5:302023-10-11T14:42:15+5:30
गोरेगाव येथील जय भवानी इमारतीला लागलेल्या आगीचे कारण अजून गुलदस्त्यातच आहे.
मुंबई :
गोरेगाव येथील जय भवानी इमारतीला लागलेल्या आगीचे कारण अजून गुलदस्त्यातच आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा निष्कर्ष अग्निशमन दल दोन ते तीन दिवसांत काढणार होते. मात्र, आता आगीची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आल्याने अग्निशमन दलाने ‘अळीमिळी गुपचिळी’ अशी भूमिका घेतली आहे. या संदर्भात काहीही बोलण्यास अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली.
८ सदस्यांची समिती
आगीची कारणे शोधण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पालिकेने आठ सदस्यांची समिती नेमली आहे. समितीला सात दिवसांत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.
प्रतिक्रिया देणे टाळले
आग लागल्यानंतर आगीच्या कारणांचा दोन दिवसांत शोध घेऊ, साक्षीदार तपासू, असे दलाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले होते. त्यादृष्टीने कामही सुरू झाले होते. आता मात्र आपले निष्कर्ष अग्निशमन दल समितीलाच सादर करेल. या संदर्भात दलाचे प्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांच्याशी संपर्क साधला असता, आगीच्या कारणांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, आता याविषयावर काहीही प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.