Join us

गोरेगाव आग प्रकरण: राज्य सरकारकडून ५ लाख तर केंद्राकडून २ लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 2:15 PM

जखमींवर शासकीय खर्चाने उपचार; मुख्यमंत्री शिंदे, पंतप्रधान मोदी यांच्याकडून सहवेदना

Goregaon Fire Ex Gratia:  गोरेगावच्या उन्नत नगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून मोठी दुर्घटना झाली. मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास पार्किंग स्पेसमध्ये आग लागली. त्या आगीमुळे धुराचे लोट उठले. त्यामुळे सुमारे ८ लोकांचा घुसमटल्याने मृत्यू झाल्याची माहिती मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली. याशिवाय अंदाजे ४४ जण जखमी झाले असून अनेक कार आणि दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. या संदर्भात मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून राज्य आणि केंद्र सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.

गोरेगावमधील आगीच्या प्रकरणात मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून २ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 'मुंबईतल्या गोरेगाव इथल्या आगीच्या दुर्घटनेतील जीवितहानी वेदनादायी आहे.  मृतांच्या कुटुंबियांप्रती  शोक संवेदना. जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं, अशी मी प्रार्थना करतो. सर्व पीडितांना आवश्यक ती मदत प्रशासन करत आहे. मृतांच्या कुटुंबीयांना PMNRF मधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. तसेच जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जातील,' अशी माहिती पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत

सहवेदना प्रकट करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, या दूर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांप्रति सहवेदना व्यक्त करतो. या आगीच्या घटनेबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून वेळोवेळी माहिती घेत आहे. मुंबईचे शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत.' या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटूंबियांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात यावी तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात यावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आला आहे.

टॅग्स :गोरेगावआगएकनाथ शिंदे