मुंबई : गोरेगाव पश्चिम उन्नत नगर येथील जय भवानी एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत ६३ सदनिका धारकांचा संसारच उद्ध्वस्त झाला. होत्याचे नव्हते झाले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते येथे येऊन गेले. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून ५ लाखांची मदत जाहीर केली. सर्वांनी आम्हाला सहानुभूती दाखवली, मात्र अजून आर्थिक मदत त्यांना मिळालेली नाही. हातात पैसा नाही, कपडे नाही, किती दिवस आम्ही बाहेर राहायचे, या इमारतीची घडी कधी नीट बसेल आमचा संसार पुन्हा येथे कधी सुरू होईल, या विवंचनेत येथील सर्व कुटुंबीय आहेत.
सध्या इमारत सील केली असून या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. नागरिकांना अजून येथील वीजपुरवठा आणि इमारतीची दुरुस्ती बंद आहे. दुसऱ्या दिवशी येथील काही नागरिक बाहेर रस्त्यावर होते. मुंबई महानगर पालिकेच्या पी. दक्षिण विभागाने येथील नागरिकांची तात्पुरती व्यवस्था उन्नतनगर येथील महापालिका शाळेत केली आहे.
नंदाबेन भोजया आणि रिंकू विजय तलसानिया यांचे मृतदेह सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये होते. तिकडून कृष्णा नगर येथे रखा दादाजी मंदिरात विधी पार पडल्यावर नंतर या दोघांवर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.