गोरेगाव, मालाड राहणार कोरडे ठाक; पालिकेच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 12:51 PM2023-06-06T12:51:59+5:302023-06-06T12:52:42+5:30
पुढील वर्षभरात त्या पूर्ण होतील, अशी माहिती पालिकेने दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अतिवृष्टीमुळे पश्चिम उपनगरातील सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. यंदा पश्चिम उपनगरांतील चार सखल ठिकाणी पाणी साचण्यापासून पूर्णपणे दिलासा मिळणार असून, आणखी ३१ ठिकाणी निरनिराळ्या उपाययोजना सुरू असून, पुढील वर्षभरात त्या पूर्ण होतील, अशी माहिती पालिकेने दिली.
कुठे आणि काय उपाययोजना?
गोरेगाव पूर्व येथील स्क्वाटर कॉलनी परिसरात ६०० मिमी रुंदीची पर्जन्य जलवाहिनीची क्षमतावाढ करत ती १५०० मिमी रुंद क्षमतेची केली.
पाटकर वाडीमध्ये पर्जन्य जलवाहिनीची क्षमतावाढ
पी उत्तर विभागातील मालाड पूर्व येथे सेंट्रल ऑर्डीनन्स डेपो गेट ते पाटकर वाडी नाल्यापर्यंत पर्जन्य जलवाहिनीच्या बॉक्स ड्रेनमुळे रहिवाशांना पाणी तुंबण्यापासून दिलासा मिळणार आहे. सी. ओ. डी. द्वारापासून कुरार नाल्यापर्यंत मंच्छुभाई रस्त्याजवळ असलेली ६०० मिमीची पर्जन्य जलवाहिनी आता १२०० मिमीपर्यंत वाढविली आहे. पाटकर वाडीच्या उत्तरेला सी. ओ. डी. बफर झोनमुळे येणाऱ्या लोंढ्याने पाटकर वाडी भाग जलमय होत होता. या समस्येवर उपाय म्हणून यावर्षी सी. ओ. डी. व रेल्वे मार्गाच्या मध्ये एक खंदक बनवून त्याला उत्तरेकडे पोईसर नदीला जोडण्यात आले आहे.
सांताक्रुझ ठप्प होणार नाही
स्वामी विवेकानंद मार्ग ते लिंकिंग रोडदरम्यान पावसाचे पाणी साचल्याने दरवर्षी वाहतूक ठप्प होते. परिणामी सांताक्रुझ स्थानक परिसरापर्यंत होतो. यावर उपाय म्हणून जे. के. मेहता रस्त्यावरील ४३० मीटर लांबीची बॉक्स ड्रेन १.५ मीटर रुंदीवरून ३.० मीटर रुंदीची केली आहे.
कार्गो संकुल नाल्याचे खोलीकरण
- सहार गाव तसेच अंधेरी कार्गो एअरपोर्टला लागून असलेला नाला पूर्वी ४ ते ५ मीटर रुंद होता. शिवाय नाल्याच्या भिंतीही जीर्ण अवस्थेत होत्या.
- दरम्यान, ६५० मीटर लांबीचा हा नाला विमानतळाच्या इंधन वाहिनी नाल्याच्या शेजारून जात असल्याने, त्याच्या रुंदीकरणाला मर्यादा येत होत्या.
- एअर इंडियासोबत पाठपुरावा करून ही इंधन वाहिनी काढल्यानंतर नाला आता ६ ते ८ मीटर रुंद केला आहे.
- नाल्याचे खोलीकरणही करण्यात आले. त्यामुळे सहार गाव, आंतरराष्ट्रीय विमानतळ (कार्गो विभाग), सहार पोलिस ठाणे, सुतार पाखडी पोलिस ठाणे, चर्च पाखाडी आणि कार्गो विभागातील पावसामुळे पाणी साचण्याची समस्या निकाली निघाली आहे.
आकुर्ली मार्गावर बॉक्स ड्रेनचे विस्तारीकरण
कांदिवली पूर्वेतील आकुर्ली मार्ग ते पश्चिम द्रुतगती मार्ग परिसरात पाणी साचून रस्ते वाहतुकीवर परिणाम होतो. त्यामुळे पर्जन्य जल वाहिनी विभागाकडून आकुर्ली मार्गावरील ठाकूर हाऊस व आकुर्ली मार्गावरील सार्वजनिक स्वच्छतागृहासमोर बॉक्स ड्रेन रुंद केला. रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या रुंद केल्या आहेत.
पश्चिम उपनगरात वाढणारी नागरी वस्ती आणि उपनगराचा होणारा विस्तार या बाबींचा विचार करून नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळेल, या पद्धतीने कामे प्रगतिपथावर आहेत. त्यात नाले स्वच्छता, रुंदीकरण, खोलीकरण आणि विस्तारीकरणाची कामे सुरू आहेत. सखल भागांमध्ये अंधेरी सब वेसह अनेक नागरी वस्तीच्या भागात नागरिकांना पाणी साचण्यापासून दिलासा मिळेल, अशा पद्धतीने विशेष काळजी घेण्यात आली. - पी वेलरासू, अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प)