लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बिहारमध्ये भागलपूर जिल्ह्यातील गंगा नदीवरीस कोसळलेल्या पुलाच्या कंत्राटदाराकडेच मुंबईतील गोरेगाव- मुलुंड लिंक रोड काम कायम राहणार आहे. वृत्तपत्रातील बातम्या व कोणाच्या मागणीवरून कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेणार नाही, अशी ठाम भूमिका पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घेतली आहे.
बिहारची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संबंधित कंत्राट रद्द करण्याची मागणी होत असली तरी या पुलाचे काम मुंबई आयआयटीच्या मान्यतेनंतरच सुरू करण्यात आले आहे, असेही चहल यांनी सांगितले. मुलुंड येथील खिंडीपाडा उन्नत मार्ग, गोरेगाव येथील प्रस्तावित सहापदरी उड्डाणपूल बांधण्याचे काम एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले आहे. बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीवर उभारला जाणारा पूल कोसळला असून हे काम एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन कंपनीने केले होते. त्यामुळे बिहारची पुनरावृत्ती टाळायची असेल तर एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शनला दिलेले कंत्राट रद्द करण्यात यावे व कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली होती. तसे पत्र त्यांनी पालिका आयुक्त डॉ. चहल यांना दिले आहे. मात्र, कोणाची मागणी व वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांवरून कुठलाही निर्णय घेणे शक्य नाही.
पूल दुर्घटनेच्या अहवालाचा अभ्यास करू
बिहार राज्यातील पूल दुर्घटनेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याचा अभ्यास करण्यात येईल. तसेच हे काम आयआयटी मुंबईने दिलेल्या अहवालानंतर व प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट यांनी बांधकाम योग्य होत असल्याचे निरीक्षण नोंदविल्यानंतरच देण्यात आल्याचे चहल यांनी मंगळवारी सांगितले.
असा आहे गोरेगांव-मुलुंड लिंक रोड
- मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा गोरेगांव - मुलुंड लिंक रोड महापालिकेचा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे.
- सुमारे १२.२ किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे.
- या प्रकल्पासाठी १० हजार कोटी खर्च करण्यात येणार आहे. या लिंक रोडचे काम २०१९ मध्ये सुरू करण्यात आले आहे.
- एलिव्हेटेड, भुयारी मार्ग तसेच उड्डाणपूल या मार्गावर असणार आहे. पहिल्या दोन टप्प्यांतील कामे डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण केली जाणार आहेत.