गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाला येणार वेग; ५१ बांधकामे हटविली : वाहतूक समस्या सुटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 10:34 AM2024-06-08T10:34:18+5:302024-06-08T10:36:19+5:30
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाआड येणारी मालाडमधील ५१ बांधकामे महापालिकेच्या ‘पी उत्तर’ विभागाने शुक्रवारी हटवली.
मुंबई :गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाआड येणारी मालाडमधील ५१ बांधकामे महापालिकेच्या ‘पी उत्तर’ विभागाने शुक्रवारी हटवली. त्यामुळे या प्रकल्पाला वेग येणार असून, मालाडमधील वाहतूक समस्या सोडविण्यासही मदत होणार आहे.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. सुमारे १२.२ किमी लांबीचा हा मार्ग चार ते पाच विभागांतून जातो. या मार्गावर अनेक ठिकाणी बांधकामे, अनधिकृत बांधकामे असून, ती टप्प्याटप्प्याने हटविण्यात येत आहेत. याच कारवाईचा भाग म्हणून शुक्रवारी या रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित होत असलेली सात निवासी व ४४ अनिवासी अशी ५१ बांधकामे ‘पी उत्तर’ विभागाने हटवली.
परिमंडळ ४ चे उपायुक्त विश्वास शंकरवार, ‘पी-उत्तर’ विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी ही कारवाई केली. दोन जेसीबी सयंत्र, ३० कामगार आणि सात अभियंते यांच्या मदतीने ही बांधकामे हटवण्यात आली.
प्रकल्प चार टप्प्यांत-
१) पहिला टप्पा : नाहूर रेल्वे स्थानकाजवळ उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे बांधकाम.
२) दुसरा टप्पा : जोडरस्त्याचे पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये रुंदीकरण.
३) तिसरा टप्पा : विविध चौकांवर उड्डाणपूल तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली दोन बोगदे प्रस्तावित.
४) चौथा टप्पा : पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावरील चौकावर उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग.